एक्स्प्लोर
West Bengal Election : एक 'दर्गा' बदलणार बंगालचं सत्ता समीकरण?
West Bengal Election : कोलकातापासून 40 किमीवर असलेल्या फुरफुरा शरीफचा प्रभाव फक्त पश्चिम बंगालच नाही तर आसामच्या काही भागांमध्येही आहे. ज्या दर्ग्यात मोठे नेते आपली मन्नत मागण्यासाठी येतात त्याच दर्ग्याच्या पीरजादांनी निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानं फुरफुरा शरीफचं नाव बंगालच्या राजकीय नकाशावर ठळकपणे उमटलंय.

furfura_sharif_dargah_kolkatta
West Bengal Election : साडेचारशे वर्षांचा सुफी संतांचा वारसा असलेल्या फुरफुरा शरीफच्या दर्ग्यानं बंगालचं राजकारण ढवळून काढलंय.
बंगालच्या राजकारणात पहिल्यांदाच फुरफुरा शरीफचे पीरजादा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाची घोषणा केली. पण यामध्ये खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा अब्बास सिद्दीकी यांनी डावे आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करुन इन्डियन सेक्युलर फ्रन्ट ISF ची स्थापना केली.
कोलकातापासून 40 किमीवर असलेल्या फुरफुरा शरीफचा प्रभाव फक्त पश्चिम बंगालच नाही तर आसामच्या काही भागांमध्येही आहे. ज्या दर्ग्यात मोठे नेते आपली मन्नत मागण्यासाठी येतात त्याच दर्ग्याच्या पीरजादांनी निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानं फुरफुरा शरीफचं नाव बंगालच्या राजकीय नकाशावर ठळकपणे उमटलंय.
पश्चिम बंगालमधला अल्पसंख्याक मतदार हा भाजपच्या हिंदूत्ववादी विचारांशी सहमत नाही. त्यामुळे ते आपली राजकीय जागा ममतांमध्ये शोधत होते. पण अब्बास सिद्दीकी यांनी सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून मुस्लिमांना हक्क मिळवून देऊ असा दावा केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मतदार विभाजीत झालाय. असदुद्दीन ओवेसी यांनी पीरजादा अब्बास सिद्दीकी यांना पाठिंबा दिलाय. म्हणूनच टीएमसी पीरजादा अब्बास सिद्दीकी यांना काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप करतेय.
दुसरीकडे, ममता दीदी मुस्लिमांची मतं घेतात. पण त्यांची कामं करत नाही असा दावा सिद्दीकी यांनी केलाय. एकेकाळी सिंगूर आणि नंदीग्रामच्या आंदोलनात ममतांच्या सोबत उभे राहणारे पीरजादा अब्बास आता मात्र ममतांवर टीकेचा भडीमार करतायत.

पीरजादा अब्बास सिद्दिकी यांंच्या राजकीय प्रवेशाला त्यांच्या परिवारातल्या लोकांनीच विरोध केलाय. शांतताप्रीय सुफी परंपरेचं तत्त्वज्ञान सांगणार्या फुरफुराचे पीरजादा खोवा सिद्दीकी यांनी पुतण्याच्या राजकीय प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. धर्मकारण करणाऱ्यांनी राजकारण करु नये असं त्यांचं म्हणणं आहे. अब्बास सिद्दीकींचे काका खोवा सिद्दीकी हे ममतांना समर्थन करतात. पण अब्बास सिद्दिकी मात्र आपल्या मतावर ठाम आहे.
फुरफुरा शरिफच्या दर्ग्यात माथा टेकवल्यावर बाहेर पडताना लोक दर्ग्याकडे पाठ करत नाही. उलट्यापावली चालत जाण्याची इथली प्रथा आहे. पीरजादा अब्बास सिद्दिकी यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास उलट्या पावलांचा होतोय की बंगालचा किंगमेकर ठरवणारा होतोय हे २ मे रोजी मतदान यंत्र्यातल्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
आणखी वाचा
























