Weather Update : 'या' भागात पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात गारठा वाढला; आजचं हवामान कसं असेल?
IMD Weather Forecast : गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Weather Update Today : पाऊस जाता जाईना... डिसेंबर महिना संपत आला तरी पावसाने (Rain Update) मात्र, पाठ सोडलेली नाही. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Rain Update) पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. हवामान विभागानुसार, पुढील तीन दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामधील काही भागांमध्ये दाट धुक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, मात्र थंडी वाढणार असून कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात लक्षणीय घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, 22 ते 24 डिसेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. 23 डिसेंबरला पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस
21 डिसेंबरला दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली होती. त्यानुसार, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. आयएमडीच्या अंदाजानुसार, आजपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, त्यानंतर थंडी आणखी वाढेल. हवामान खात्याकडून पंजाबमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारतात पावसाचा जोर कायम
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून संपूर्ण उत्तर भारतात पावसाचा जोर कायम राहील, त्यानंतर थंडी आणखी वाढेल. देशभरातील लोकांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सकाळपासून दाट धुके पाहायला मिळत आहे, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीत मागील दिवसांच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिल्लीत हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार, आज म्हणजेच 22 डिसेंबरला दिल्लीत हलक्या पावसानंतर तापमान पाच अंशांवर पोहोचेल.