PM Modi Virtual rally : पंतप्रधान मोदींचा उद्याचा पश्चिम बंगाल दौरा रद्द, उद्या संध्याकाळी 5 वाजता करणार व्हर्च्युअल रॅली
राज्यांची ऑक्सिजनची मागणी ओळखून त्यानुसार त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या पश्चिम बंगालमधील उद्याचा दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या उच्च स्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या पश्चिम बंगालला जाणार नाही. पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या पश्चिम बंगालला जाणार होते. परंतु पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी पाच वाजत व्हर्च्युअल रॅली करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तसेच ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याचे मार्ग आणि उपाय यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुधारण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणे, ऑक्सिजनच्या वितरणाचा वेग वाढवणे आणि आरोग्य सुविधा केंद्रांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करणे अशा विविध पैलूंबाबत वेगाने काम करण्याची गरज पंतप्रधानानी या बैठकीत व्यक्त केली.
विविध राज्यांची ऑक्सिजनची मागणी ओळखून त्यानुसार त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. देशातील 20 राज्यांच्या प्रतिदिन 6,785 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनच्या सध्याच्या मागणीला प्रतिसाद म्हणून प्रत्यक्षात भारत सरकार त्या राज्यांना प्रतिदिन 6,822 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे.
भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान झाले आहे. आज सहाव्या टप्प्यातील मतदान झाले आहे. सातव्या टप्प्यासाठी 36 जागांसाठी 26 एप्रिल आणि आठव्या टप्प्यासाठी चार जिल्ह्यातील 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे.