Uttar Pradesh BJP Candidates List 2024 : भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशात रिस्क घेतलीच नाही; इंडिया आघाडीमुळे नेमका काय संदेश दिला?
भाजप उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खासदारांची तिकिटे रद्द करू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत असा कोणताही बदल दिसला नाही.
Uttar Pradesh BJP Candidates List 2024 : भाजपने शनिवारी (2 मार्च) लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) साठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या म्हणजेच उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh BJP Candidates List 2024) लोकसभेच्या 51 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यूपीच्या उमेदवारांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. यूपीच्या 51 जागांसाठी उमेदवार जाहीर करून भाजपने सर्व प्रकारच्या अटकळ आणि अंदाजांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी भाजप उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खासदारांची तिकिटे रद्द करू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत असा कोणताही बदल दिसला नाही. उलट या यादीत 47 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर ज्या लोकसभेच्या जागांवर भाजपने नवे चेहरे उभे केले होते त्या जागांवर गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. राजकीय अंकगणित पाहता भाजपने पहिल्या उमेदवार यादीत 100 टक्के जुन्या आणि विजयी चेहऱ्यांवर बाजी मारली आहे.
इंडिया आघाडीचा सुद्धा इफेक्ट? (India Alliance)
उत्तर प्रदेशात भाजपकडून 51 पैकी विद्यमान 47 उमेदवारांना संधी देताना कोणतीच रिस्क घेतलेली नाही. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे भाजपसमोर तगडे आव्हान असणार आहे. बऱ्याच नाराजीनाट्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने जागवाटप पूर्ण केलं आहे. उत्तर प्रदेशात सपा 63 जागांवर लढणार असून काँग्रेसला 17 जागा देण्यात आल्या आहेत. अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनाही उत्तर प्रदेशात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी आंदोलनाचा सुद्धा उत्तर प्रदेशात बराच प्रभाव राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये भाजपने कोणतीही रिस्क घेतलेली दिसत नाही. शेतकऱ्यांना चिरडण्याचा आरोप असलेल्या अजय टेनी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रचारात वादाचा मुद्दा राहण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीशिवाय या यादीत कोणतेही मोठे बदल नाहीत
भाजपने दिल्ली वगळता इतर कोणत्याही राज्यात मोठे बदल केलेले नाहीत. वादग्रस्त विधानांमध्ये गुंतलेल्या काही खासदारांची (प्रज्ञा सिंह ठाकूर आणि मीनाक्षी लेखी) तिकिटे रद्द करण्यात आली आहेत, परंतु मोठ्या प्रमाणावर तसे झालेले नाही. सोप्या शब्दात सांगायचे तर, भाजपच्या हायकमांडने विजयी उमेदवारांवरच बाजी लावली आहे.
यूपीमधून कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली?
जर आपण यूपीच्या उमेदवार यादीत दिसलेल्या चार नवीन चेहऱ्यांबद्दल बोललो तर 2019 मध्ये या जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जौनपूरमधून कृपाशंकर सिंह, आंबेडकर नगरमधून रितेश पांडे, श्रावस्तीमधून नरेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा आणि नगीनामधून ओम कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यूपीमधील लोकसभेच्या 80 जागांपैकी भाजप आपल्या मित्रपक्षांना काही जागा देणार आहे. या स्थितीत यूपीची पुढील यादी धक्कादायक असू शकते.