(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UP Election 2022: उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेत्याची आत्मदहनाची धमकी, प्रियंका गांधींवर गंभीर आरोप
UP Election 2022: देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
UP Election 2022: देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) काँग्रेस पक्षानं गुरुवारी 41 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, मुझफ्फरनगर जिल्ह्यातून तिकीट न मिळाल्यानं काँग्रेस नेत्या मेराज जहाँ यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. नुकताच त्यांचा तिकीट नाकारल्यानं रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तसेच पक्षानं तिकीटासाठी त्यांच्याकडं पैशांची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केलाय. याचपार्श्वभूमीवर त्यांनी मुझफ्फरनगर येथून तिकीट न मिळल्यानं आत्मदहन करण्याची पक्षाला धमकी दिलीय.
मेराज जहाँ म्हणाल्या की, "काँग्रेस सरचिटणीत प्रियंका गांधी यांच्या 'लडकी हू लढ सकती हू', ही केवळ एक टॅगलाईन आहे. मी गेले अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करीत आहे. पण आज माझी फसवणूक झाल्यासारखं मला वाटतंय. 40 टक्के फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील सहा जागांसाठी पक्षाने किमान दोन महिला उमेदवारांना मान्यता द्यायला हवी होती. काँग्रेस पक्षाला मुलींची पर्वा नाही. मला न्याय मिळाला नाही तर, मी आत्महत्या करेन, असंही मेराज जहाँ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत."
पुढे मेराज जहाँ म्हणाल्या की, "माझ्या अश्रूमागचं कारण म्हणजे मी काँग्रेसमध्ये जवळपास १३ वर्षांपासून काम करीत आहे. याआधीही मला तिकीट देण्यात येणार होतं. पण काँग्रेसनं लोकदलासोबत युती केल्यानं ते रद्द झालं. यावेळी मला तिकीट मिळेल, अशी आशा होती. मात्र, यंदाही पक्षानं मला तिकीट नाकारलं. माझ्यासारखे लोक पक्षासाठी अहोरात्र झटत आहेत. आम्ही अनुभवी नेते आहोत. आम्ही पक्षासाठी खर्च केलाय. आता निवडणूक आली तर, मला तिकीट दिलं नाही. हा अन्याय नाही का? विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी उत्तर प्रदेशातील 41 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मुझफ्फरनगरमधून काँग्रेसने सुबोध शर्मा यांना उमेदवारी दिली आहे."
हे देखील वाचा-
- 'अमर जवान ज्योती' वरुन राजकारण तापलं! विलिनीकरणावरुन राहुल गांधींची टीका, भाजपचं प्रत्युत्तर
- गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha