उन्नाव बलात्कार प्रकरण, सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई
उन्नाव पीडितेवर आज अत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिल्याशिवाय पीडितेवर अत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता.
उन्नाव : उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी सात पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. बेजबाबदारपणा आणि गुन्हा रोखण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रभारी निरीक्षक अजय कुमार त्रिपाठी, बीट प्रभारी उपनिरीक्षक अरविन्द सिंह रघुवंशी, उपनिरीक्षक श्रीराम तिवारी, अब्दुल वसीम, पंकज यादव, मनोज, संदीप कुमार अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिल्याशिवाय पीडितेवर अत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता. उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडितेवर आज अत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन द्यावं, अशी मागणी पीडितेच्या बहिणीने केली होती. शनिवारी पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
उन्नावमधील हिंदूपूर गावात मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी आणि पीडित मुलगी शेजारी राहत होते. दोन्ही कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध असल्याने शिवम आणि पीडित मुलीची हळूहळू मैत्री वाढली आणि प्रेमात रुपांतर झालं. पीडितेच्या कुटुंबाच्या दाव्यानुसार दोघांनी कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. अर्थात ही बाब कुटुंबाला माहिती नव्हती. काही दिवसांनी शिवम त्रिवेदीने विवाह केल्याचे मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडण झालं. शिवमच्या कुटुंबाने पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलंही होतं.
अखेर गेल्या वर्षी 12 डिसेंबर 2018 ला पीडित मुलीने शिवम आणि त्याचा मित्र शुभमने बलात्कार केल्याचा आरोप केला. पीडितेने 13 डिसेंबर 2018 ला स्थानिक पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. 20 डिसेंबर 2018 ला पीडितेनं रजिस्टर्ड पोस्टाने आपली तक्रार रायबरेली पोलीस अधीक्षकांकडे पाठवली. मात्र काहीच झालं नाही.अखेर 4 मार्च 2019 ला रायबरेली कोर्टाच्या आदेशानं शिवम आणि शिवमवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
कोर्टाच्या तारखेसाठी 5 डिसेंबरला रायबरेली जाण्यासाठी पीडित तरुणी पहाटे 4 वाजता घरातून बाहेर पडली. पीडितेच्या दाव्यानुसार, घरापासून काही अंतरावर असताना शिवम आणि शुभमने दांडक्याने आणि चाकूने तिच्यावर हल्ला केला. ती जखमी होऊन खाली कोसळल्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. पहाटेची वेळ असल्याने फारसं कुणी जागं नसल्याने तिला मदत मिळाली. तिला उन्नावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ती 90 टक्के भाजली होती. त्यामुळे तिला तातडीने लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती बिघडू लागल्याने 5 डिसेंबरला संध्याकाळी तिला एअरलिफ्ट करुन दिल्लीतील सफदरजंगमध्ये उपचारासाठी आणलं. मात्र काल रात्री 6 डिसेंबरला 11 वाजून 40 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या -