विद्यापीठ, कॉलेज कॅम्पसमध्ये जंक फूडवर बंदी, यूजीसीचे निर्देश
विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने सर्व विद्यापीठांना आणि उच्च शिक्षण संस्थाना आपल्या कॅम्पसमध्ये जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने सर्व विद्यापीठांना आणि उच्च शिक्षण संस्थाना आपल्या कॅम्पसमध्ये जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबधीचं कारण पुढे करत यूजीसीने हे निर्देश दिले आहेत.
यूजीसीने विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं की, "कॉलेज कॅम्पस परिसरात जंक फूडवर बंदी घातल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमधील लठ्ठपणाचं प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. वजन वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते, त्यावर नियंत्रण मिळवणे यामुळे शक्य होईल", असं यूजीसीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. युवकांमध्ये जंक फूडबाबत जागृकता निर्माण करणेही महत्त्वाचे असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटलं आहे.
याआधी सीबीएसई बोर्डाने असा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये सीबीएसईच्या सर्व शाळांमधील कॅन्टीनमधील मेन्यूत जंक फूड हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी जेवणाच्या डब्याची तपासणी केली जात असे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जेवणाबाबत जागृकता निर्माण करणे आणि त्यांच्या आरोग्याची नियमीत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.