Nipah Virus : कोझिकोडमध्ये तापामुळे दोघांचा मृत्यू; केरळमध्ये निपाह व्हायरसचा अलर्ट, व्हायरस किती धोकादायक?
Nipah Virus : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं वृत्त आहे. कोझिकोड जिल्ह्यात तापामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय आहे.
Nipah Virus Alert in Kerala : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा (Nipah Virus) प्रादुर्भाव झाल्याचं वृत्त आहे. कोझिकोड (Kozhikode) जिल्ह्यात तापामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय आहे. यानंतर केरळच्या (Kerala) आरोग्य विभागाने कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसशी संबंधित अलर्ट जारी केला आहे.
आरोग्य विभागाने सोमवारी रात्री परिपत्रक जारी करुन म्हटलं की, "राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरिय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तापानंतर दोन जणांना अनैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती एका खासगी रुग्णालयातून मिळाली. त्यांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाला असावा, अशी शंका आहे. निपाह व्हायरसच्या संशयामुळे एका मृताच्या नातेवाईकाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं आहे."
कोझिकोडमध्ये याआधीही निपाह व्हायरसचा संसर्ग
दरम्यान, कोझिकोड जिल्ह्यात 2018 आणि 2021 मध्येही निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण 19 मे 2018 रोजी कोझिकोडमध्ये आढळला होता. त्यावेळी एकूण 23 रुग्ण आढळले होते. त्यावेळी 17 जणांचा मृत्यू झाला होता.
निपाह व्हायरस काय आहे, तो कसा पसरतो?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओच्या माहितीनुसार, निपाह हा नवीन व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांद्वारे मनुष्यांमध्ये पसरतो. तसंच दूषित जेवणाच्या माध्यमातून हा व्हायरस एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा संसर्ग होतो. हा व्हायरस सर्वात आधी 1998 मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमध्ये आढळला होता. त्यामुळेच या व्हायरसचं नाव निपाह असं आहे. यानंतर सिंगापूर आणि बांगलादेशमध्येही या व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले होते. हा व्हायरस वटवाघूळ आणि डुक्करांद्वारे मनुष्यामध्ये परसतो.
निपाह व्हायरसची लक्षणे काय आहेत?
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव, न्युमोनिया यांसारखी लक्षणे दिसातात. एखाद्याची प्रकृती गंभीर असेल तर त्याला एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) होऊ शकतो आणि 24 ते 48 तासांच्या आत कोमामध्ये जाऊ शकतो. निपाह व्हायरसची लक्षणे 5 ते 14 दिवसांच्या आत दिसतात. पण काही प्रकरणात लक्षणे दिसण्यासाठी 45 दिवसांचा काळही लागू शकतो. पण हे अतिशय धोकादायक आहे, कारण संबंधित व्यक्तीला व्हायरसची लागण झाल्याचं समजणार नाही आणि तोपर्यंत हा व्हायरसचा संसर्ग इतर लोकांमध्येही पसरु शकतो. तर काहींना या व्हायरसची लागण होऊनही त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.
निपाह व्हायरसचा संसर्ग झाल्याचं कसं समजेल?
या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शंका आल्यास RT-PCR करु शकता. याशिवायी PCR, सीरम न्यूट्रिलायझेशन टेस्ट आणि एलाईजा टेस्टद्वारे या व्हायरसची लागण झालीय की नाही हे तपासू शकता.
हेही वाचा
Nipah Virus : फळं न धुता खाताय? थांबा, इकडे लक्ष द्या, होऊ शकतो निपाहचा संसर्ग