Todays Headline 24th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
वाराणसी कोर्ट आज सुनावणार निकाल
ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालय मंगळवारी दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा मंगळवारीच सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी करणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (24 मे) पहिला क्वालीफायर सामना खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. कारण, या सामन्यात पराभूत झालेला संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघासोबत क्वालीफायरचा दुसरा सामना खेळावा लागणार आहे. क्वालीफायर- 2 मध्ये जिंकणारा संघ क्वालीफायर-1 मध्ये जिंकलेल्या संघाशी अंतिम सामना खेळेल.
एथर इंडस्ट्रीजचा आयपीओ आज बाजारात
रसायनांची निर्मिती करणाऱ्या 'इथर इंडस्ट्रीज' ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या 24 मेपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना 26 मेपर्यंत अर्ज करता येईल.