Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याबाबतचा तपास एसआयटीला दिला आहे. मग आधी माध्यमांसमोर जाण्याची काय गरज होती? निदान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, असे कोर्ट म्हणाले.
नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या मुद्द्यावर (Tirupati Laddu controversy) सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर 4 याचिकांवर सुनावणी झाली. लाडूंची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी याचिकांमध्ये करण्यात आली. याचिकाकर्त्यांमध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी, वाय.व्ही. सुब्बा रेड्डी, विक्रम संपत आणि दुष्यंत श्रीधर. सुरेश चव्हाणके यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सोनिया माथूर यांनी युक्तिवाद केला. सिद्धार्थ लुथरा आणि मुकुल रोहतगी हे आंध्र प्रदेश सरकारचे वकिल आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडूंना फटकारले
सुब्रमण्यम स्वामींच्या वतीने ज्येष्ठ वकील राजशेखर राव सर्वोच्च न्यायालयात म्हणाले की, मी भक्त म्हणून न्यायालयात हजर झालो आहे. प्रसादच्या भेसळीवर प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या वक्तव्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील आणि जातीय सलोखा बिघडू शकतो. तो चिंतेचा विषय आहे देवाच्या प्रसादावर काही प्रश्नचिन्ह असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावर कोर्ट म्हणाले की, 'जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याबाबतचा तपास एसआयटीला दिला आहे. मग आधी माध्यमांसमोर जाण्याची काय गरज होती? निदान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा.
तिरुपती मंदिरातील देऊळातील प्राण्यांच्या चरबीचा मुद्दा समोर आल्यानंतर सातत्याने राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी रविवारपासून (22 सप्टेंबर) 11 दिवसीय तपश्चर्या सुरू केली. या काळात ते उपवास करणार आहेत. पवन म्हणाले की, भेसळीबद्दल मला आधी का कळू शकले नाही याचे मला खेद वाटतो. मला वाईट वाटत आहे. याचे मी प्रायश्चित करीन.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. जगन 28 सप्टेंबर रोजी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात विशेष विधी करणार होते. त्यांना एक दिवस आधी नोटीस बजावण्यात आली. नोटीसमध्ये वायएसआरसीपी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिरुमला मंदिरात जाण्याची परवानगी नसल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांनी दौरा स्थगित केला.
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आणि प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादममध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ केल्याच्या आरोपानंतर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हैदराबादमधील सैदाबाद पोलिस ठाण्यात एका वकिलाने ही तक्रार दाखल केली आहे.
हा वाद कसा समोर आला?
कर्नाटक कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन (KMF) गेल्या 50 वर्षांपासून ट्रस्टला सवलतीच्या दरात तिरुपती देवस्थानला तूप पुरवत आहे. तिरुपती मंदिरात दर सहा महिन्यांनी 1400 टन तूप वापरले जाते. जुलै 2023 मध्ये, कंपनीने कमी दराने पुरवठा करण्यास नकार दिला, त्यानंतर जगन सरकारने (YSRCP) 5 कंपन्यांना पुरवठ्याचे काम दिले. तमिळनाडूतील दिंडीगुल येथील एआर डेअरी फूड्स यापैकी एक आहे. या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या उत्पादनात दोष आढळला होता.
इतर महत्वाच्या बातम्या