(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी-सैन्यात चकमक; एक जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
सैनिकांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. दहशतवाद्यांनी सैनिकांचं आवाहन झुगारुन गोळीबार सुरु केला. त्यानंतर पर्याय न उरल्याने सैनिकांनीही चौख प्रत्युत्तर देत, गोळीबार सुरु केला. त्यात तीनही दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील रामबन येथील बटोट परिसरातील भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. एका घरात लोकांना डांबून हे दहशतवादी लपले होते. भारतीय सैनिकांनी नागरिकांची सुखरुप सुटका करत हे ऑपरेशन पूर्ण केलं. मात्र या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी बॅग घेऊन बसमध्ये बसण्यासाठी तयारीत होते. मात्र नागरिकांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी याची सूचना त्याठिकाणी असलेल्या गस्त घालणाऱ्या सैनिकांना दिली. सैनिकांनी तातडीने या दहशतावाद्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकले आणि गोळीबार करत तेथून पळ काढला आणि एका घरात शिरले.
घरातील काही नागरिकांना या दहशतवाद्यांनी डांबून ठेवलं. सैनिकांनीही तात्काळ या घराला घेरुन कारवाई सुरु केली. मात्र दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सैनिकांनी प्रसंगावधान राखत प्रथम परिसरातील नागरिकांना आपल्या घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवलं. मात्र दहशतवादी लपलेल्या घरात काही नागरिक उपस्थित होते. सैनिकांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं.
दहशतवाद्यांनी सैनिकांचं आवाहन झुगारुन गोळीबार सुरु केला. त्यानंतर पर्याय न उरल्याने सैनिकांनीही चौख प्रत्युत्तर देत, गोळीबार सुरु केला. भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर घाबरलेल्या दहशतवाद्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांच्या गोळीबारात तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. हारुन, जाहित आणि ओसामा अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.