Natural Gas : नैसर्गिक वायूचे प्रमाण आताच्या 6.3 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट : केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली
ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचं प्रमाण 6.3 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली.
Natural Gas : वर्ष 2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचे प्रमाण हे आताच्या 6.3 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवले असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameswar Teli) यांनी दिली. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली. दरम्यान, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी 'या' उपायोजना करण्यात येणार
राष्ट्रीय वायू ग्रीडचा विस्तार सध्याच्या 21,715 किमीवरुन सुमारे 33,500 किलोमीटर करणार
शहरांमधील गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार करण्यात येणार
द्रवीकृत नैसर्गिक वायूकेंद्र स्थापन करणे
वाहतुकीसाठी वापरला जाणारा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, घरगुती वापराच्या पाइप गॅससाठी अखंडितपणे कोणत्याही कटशिवाय घरगुती गॅसचे वितरण.
उच्च दाब, उच्च तापमान क्षेत्रे, 'डीप वॉटर' आणि 'अल्ट्रा डीप वॉटर' आणि कोळशाच्या पट्ट्यामधून उत्पादित केलेल्या वायूचे विपणन आणि किंमत निर्धारणासाठीचे अधिकारस्वातंत्र्य प्रदान करणे.
बायो-सीएनजीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय उपक्रम राबवणे
सध्या नैसर्गिक वायूचे प्रमाण 6.3 टक्के आहे. हे प्रमाण वाढवून 15 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आलं आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वरील उपायोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रामेश्वर तेली यांनी दिली.
पाइप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) जोडण्या आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) केंद्रांची स्थापना हा शहर गॅस विकास योजनेचा एक भाग आहे. हे कार्य पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या (PNGRB) अधिकृत संस्थांद्वारे केले जाते. पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या जोडण्या आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) केंद्रांची स्थापना , पीएनजीआरबीच्या अधिकृत संस्थांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार केली जाते. 31 मे 2022 पर्यंत, एकूण 95.21 लाख पीएनजी (घरगुती) कनेक्शन प्रदान केले गेली आहेत. अधिकृत संस्थांद्वारे 4 हजार 531 सीएनजी (वाहतूक) स्थानके स्थापन करण्यात आली आहेत. 11A शहर गॅस वितरण फेरी पूर्ण झाल्यानंतर 295 भौगोलिक क्षेत्र अधिकृत केली आहेत. ज्यात भारताची 98 टक्के लोकसंख्या आणि 88 टक्के भौगोलिक क्षेत्रांचा समावेश आहे. किमान कार्य कार्यक्रमानुसार, शहर गॅस वितरणातील अधिकृत संस्थाना 11A फेरीपर्यंत 12.33 कोटी पीएनजी जोडण्या प्रदान कराव्या लागतील. वर्ष 2030 पर्यंत ग्रामीण आणि शहरी भागांसह 17,700 सीएनजी स्थानकांची स्थापना करावी लागणार असल्याची मंत्री रामेश्वर तेली यांनी दिली.