शीतलहरीचा कहर; - 26 अंश तापमानामुळं द्रास, कारगिल मधील जनजीवन विस्कळीत
थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं याचे परिणाम देशात सर्वदूर दिसू लागले आहेत. त्यातच हवामानात होणाऱ्या बदलांमुळं आजारपणाही बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या हिमवर्षावामुळं आणि साठलेल्या बर्फामुळं जम्मू - काश्मीर भागात याचे परिणाम दैनंदिन जीवनावर दिसू लागले आहेत. लेह- लडाखमध्येही चित्र काही वेगळं नाही. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांत तापमान बऱ्याच अंशी कमी झालं असून, आता थंडीचा कडाका आणखी तीव्र होताना दिसत आहे.
लडाखमध्ये असणाऱ्या dras द्रास भागात तापमान -26 अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळं इथं थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. सहसा या भागात तापमानात होणारी घट ही नवी बाब नसली तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पारा खाली जाणं सर्वांचं लक्ष वेधत आहे.
तिथं कारगिलमध्येही परिस्थिती वेगळी नाही. रौद्र रुप धारण करणाऱ्या वातावरणातील या गारव्यामुळं कारगिलमध्ये धरणाचं पाणीही गोठलं आहे. त्यामुळं इथं राहणाऱ्या स्थानिकांना सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी त्यांच्यापुढं या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
पुढील काही दिवसांमध्येही थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळं इथं तापमान आणखी किती खाली जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशात सातत्यानं तापमानात होणारी ही घट पाहता हवामान खात्यानं काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं
थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं याचे परिणाम देशात सर्वदूर दिसू लागले आहेत. त्यातच हवामानात होणाऱ्या बदलांमुळं आजारपणाही बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच असणारं कोरोनाचं संकट आणि थंड वातावरणामुळं आरोग्यावर होणारे परिणाम पाहता आरोग्य खात्याकडूनही नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.