Dentist ends life : मुलं अन् सुखी संसार; हार्ट सर्जन नवऱ्याचं लफडं, 28 वर्षीय डेंटिस्टने गळ्याला लावला दोर, घटनेनं हळहळ
Telangana Dentist Dr Pratyusha ends life : आपल्या हार्ट सर्जन नवऱ्याचं एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

हैदराबाद : तेलंगणा राज्यातील हनमकोंडा जिल्ह्यातील हसनपार्थी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 28 वर्षीय डेंटिस्टने असलेल्या विवाहीत महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. मृत महिलेचे नाव डॉ. प्रत्युषा असे आहे. आपल्या हार्ट सर्जन नवऱ्याचं एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. प्रत्युषा यांचे पती डॉ. सृजन हे हृदयरोग तज्ञ आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रत्युषा एका खाजगी रुग्णालयात डेंटिस्ट म्हणून काम करत होती. 2017 मध्ये त्यांच लग्न डॉ. अल्लादी सृजन (वय 32) यांच्यासोबत झाला होता. लग्नाच्या वेळी प्रत्युषाच्या कुटुंबीयांनी 30 लाख रुपये, 30 तोळे सोनं आणि आलिशान कार देखील हुंड्यात दिली असल्याची माहिती आहे. डॉ. सृजन हे हनमकोंडा येथील एका खाजगी रुग्णालयात हृदयरोग तज्ञ आहेत. या जोडप्याला दोन मुले असून ते हसनपार्थी येथे राहतात.
पतीचे सोशल मीडिया इन्फ्लुएंसरशी प्रेमसंबंध
मृत महिलेचा पती डॉ. सृजन यांची ओळख काही काळापूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रुती (उर्फ बुट्टा बोम्मा) हिच्यासोबत झाली होती. डॉक्टरांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे श्रुतीने त्यांची मुलाखत घेतली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले, अशी माहिती आहे. डॉ. प्रत्युषांना जेव्हा आपल्या पतीच्या प्रेमसंबंधाबद्दल समजले, तेव्हा त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोर पतीला जाब विचारला, पण डॉ. सृजन यांच्या वागणुकीत बदल झाला नसल्याचे बोलले जाते. त्याउलट डॉ. सृजन पत्नी डॉ. प्रत्युषांना मारहाण करत होता, तसेच सासरची मंडळीही तिचा छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्युषा तणावाखाली होती.
राहत्या घरात टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं
सोमवारी सकाळी, डॉ. प्रत्युषा यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. पती आणि मुले शेजारच्या खोलीत असताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. डॉ. प्रत्युषा यांच्या कुटुंबीयांनी डॉ. सृजन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रुती यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून डॉ. सृजन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.























