Teesta Setalvad : गुजरात दंगलीनंतर भाजप सरकारविरोधात तिस्ता सेटलवाड यांचा अहमद पटेलांसोबत कट; गुजरात पोलिसांचा आरोप
Teesta Setalvad : गुजरात दंगलीनंतर भाजप सरकारविरोधात तिस्ता सेटलवाड यांनी कट आखला होता. यासाठी त्यांना काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी मदत केली असल्याचे गुजरात एसआयटीने म्हटले आहे.
![Teesta Setalvad : गुजरात दंगलीनंतर भाजप सरकारविरोधात तिस्ता सेटलवाड यांचा अहमद पटेलांसोबत कट; गुजरात पोलिसांचा आरोप Teesta Setalvad part of plot to topple govt post 2002 riots congress leader late Ahmed Patel helped her say gujrat police Teesta Setalvad : गुजरात दंगलीनंतर भाजप सरकारविरोधात तिस्ता सेटलवाड यांचा अहमद पटेलांसोबत कट; गुजरात पोलिसांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/94581586683657ccf08a0fe60a8c5afc1657956508_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Teesta Setalvad : गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीनंतर राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) आपल्या अहवालात केला आहे. गुजरात सरकारने तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. तिस्ता यांना सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा होती, त्यासाठी हा कट आखला असल्याचे गुजरात सरकारच्या SIT ने म्हटले आहे. एसआयटीच्या या दाव्यानंतर जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
गुजरात पोलिसांनी तिस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस अधिकारी आर.बी. श्रीकुमार यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. गुजरात पोलिसांनी दोन साक्षीदारांचा हवाला देत प्रतित्रापत्र दाखल केले आहे. गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा कट तत्कालीन राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते दिवंगत अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावर रचण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले.
एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तिस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. अहमदाबाद येथील शाहीबागमधील सर्किट हाऊसमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत अहमद पटेल यांनी सेटलवाड यांना 25 लाख रुपये दिले. त्याआधी झालेल्या एका बैठकीत पाच लाख रुपये देण्यात आले होते. हा निधी गुजरात मदत कार्याच्या नावाने घेण्यात आला होता. या बैठकीत काही राजकीय नेते उपस्थित होते. त्याशिवाय, गुजरातमध्ये गोध्रा येथील रेल्वेजळीत कांड घडल्यानंतर सेटलवाड यांनी एका आठवड्यात मदत शिबिराचा दौरा केला आणि राजकीय नेत्यांसोबत बैठका घेतल्या. दंगलीच्या चार महिन्यानंतर गुप्त पद्धतीने त्यांनी तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्टसोबत अहमद पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
राज्यसभा खासदार होण्याची महत्त्वकांक्षा
एसआयटीने आरोप केला की, केंद्र सरकारने 2007 मध्ये तिस्ता सेटलवाड यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तिस्ता यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती. हा महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिस्ता यांनी प्रयत्न केले असल्याचे एसआयटीने म्हटले. एसआयटीने एका साक्षीदाराच्या हवाल्याने सांगितले की, एका राजकीय नेत्याला तिस्ता यांनी विचारले की, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना खासदार बनवण्यात आले. मात्र, मला संधी का दिली नाही, असा प्रश्न सेटलवाड यांनी विचारला होता.
गुजरात राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या राजकीय हेतू असल्याच्या आरोपाला बळकटी देण्यासाठी एसआयटीने 2006 मध्ये पंचमहलमधील पंडारवाडामध्ये दंगल पीडितांचे मृतदेह आढळल्यानंतर सेटलवाड यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. या घटनेच्या वेळी सेटलवाड यांनी गुजरात सरकार तीन दिवसात राजीनामा देणार असल्याचे म्हटले.
निधीत हेराफेरी
तिस्ता सेटलवाड यांनी दंगल पीडितांसाठी जमवण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप केला आहे. तिस्ता यांनी या निधीचा वापर खासगी वापरासाठी केला असल्याचे म्हटले. तिस्ता सेटलवाड यांच्या 'सिटीजन फॉर जस्टिस अॅण्ड पीस' (CJP) संस्थेच्या आयडीबीआयमधील बँक खात्यात 63 लाख रुपये आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या सबरंग ट्रस्टच्या खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले होते. या निधीत मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)