Twitter India Office Raid: टूलकिट केसमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून Twitter इंडियाच्या कार्यालयाची झडती
दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात ट्विटर इंडियाला नोटीस पाठवली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की तक्रारीवरून हा तपास सुरु केला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने कॉंग्रेसच्या कथित टूलकिट प्रकरणात दिल्लीतील लाडोसराय येथील ट्विटर इंडियाच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात ट्विटर इंडियाला नोटीस पाठवली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की तक्रारीवरून हा तपास सुरु केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलेल्या एका 'टूलकिट'संबंधी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या ट्विटवर कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने या ट्वीटला 'मॅनिप्युलेटेड मीडिया' श्रेणीमध्ये टाकलं होतं.
#WATCH | Team of Delhi Police Special cell carrying out searches in the offices of Twitter India (in Delhi & Gurugram)
— ANI (@ANI) May 24, 2021
Visuals from Lado Sarai. pic.twitter.com/eXipqnEBgt
कोरोना संकटात काँग्रेस पंतप्रधान मोदींना बदनाम करण्यासाठी 'टूलकिट'चा वापर करत असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र भाजपचा आरोप फेटाळून काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली होती.
भाजपाच्या नेत्यांकडून हे टूलकिट सोशल मीडियावर शेअर करून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. मात्र, हे टूलकिट पूर्णपणे बनावट असून काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं म्हणत राहुल गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेस नेत्यांनी भाजपावर सडकून टीका केली. या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांकडे तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. या टूलकिट प्रकरणावरून छत्तीसगड पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आज या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आपला जबाब नोंदवला आहे.