एक्स्प्लोर
गोव्यात टुरिस्ट टॅक्सींचा संप, पर्यटकांची परवड, ‘एस्मा’ लागू
पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता कदंब महामंडळ तसेच जीटीडीसीने बसगाड्यांची सज्जता ठेवली आहे. दुसरीकडे काळ्या-पिवळ्या टॅक्सींनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन या बंदला दणका दिला आहे.
पणजी : गोव्यात स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत टुरिस्ट टॅक्सीमालकांनी आज शुक्रवारी बंद पुकारला आहे. टॅक्सी मालकांचा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला आहे.
राज्यभरात सुमारे २0 हजार टुरिस्ट टॅक्सी असल्याचे सांगण्यात येते. या सर्व टॅक्सी बंद राहिल्यास पर्यटकांची मोठी परवड होणार आहे. पर्यटकांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेत भविष्यात ‘उबर’, ‘ओला’सारख्या टॅक्सी सेवा सुरु कराव्या लागतील, असा इशारा सरकारने दिला आहे.
पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता कदंब महामंडळ तसेच जीटीडीसीने बसगाड्यांची सज्जता ठेवली आहे. दुसरीकडे काळ्या-पिवळ्या टॅक्सींनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन या बंदला दणका दिला आहे.
कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कदंबच्या 36 बसगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरु येथून सकाळी गोव्यात पोहोचणाऱ्या 17 आंतरराज्य बसगाड्याही स्थानिक मार्गांवर सेवेत आणल्या जातील.
पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांनी जीटीडीसीच्या 10 बसगाड्या सेवेत आणल्या जातील, अशी माहिती दिली.
दाबोळी विमानतळ तसेच करमळी, थिवी, मडगांव, वास्को आदी रेल्वे स्थानकांवर कोकण कन्या, जनशताब्दी, डबल डेकर, मांडवी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आदी रेलगाड्या पोचण्याच्या वेळेतही बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे.
या बसगाड्यांना विशेष तिकिट असणार आहे. विमानतळ ते पणजी तसेच विमानतळ ते मडगांव प्रत्येकी 100 रुपये, विमानतळ ते कळंगुट, विमानतळ ते फोंडा प्रत्येकी 150 रुपये, विमानतळ ते म्हापसा 125 रुपये तिकिट आकारले जाईल. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत बस सेवा असेल. ‘दाबोळी’वर दिवसाकाठी सरासरी 80 विमाने उतरतात.
दोन कंट्रोल रुम
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0832-2794100 या क्रमांकावर तर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0832-2225283 या क्रमांकावर संपर्क साधून पर्यटकांनी त्यांची अडचण सांगितल्यास पर्यटन खात्याचे अधिकारी आवश्यक ते साहाय्य करतील. याशिवाय जीटीडीसीच्या रेसिडेन्सींमध्ये माहिती केंद्रे उघडण्यात आलेली आहेत.
काब्राल म्हणाले की, टुरिस्ट टॅक्सीवाले पर्यटकांकडून बेसुमार पैसे आकारले जातात याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे डिजिटल मिटर प्रत्येकाने बसवायलाच हवेत. स्पीड गव्हर्नरची सक्ती कोर्टाने केलेली आहे त्यामुळे त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. बेसुमार भाडे आकरणी किंवा वरचेवर बंद पुकारु न पर्यटकांना वेठीस धरले जात असल्याने गोव्याचे नाव बदनाम होत आहे. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. आजपावेतो आम्ही संयम पाळला परंतु यापुढे कोणाचीही तमा न बाळगता ‘उबर’, ‘ओला’सारख्या टॅक्सीसेवा गोव्यात आणल्या जातील. ते पुढे म्हणाले की, टॅक्सीवाल्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी सरकारने केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. काळ्या-पिवळ्या टॅक्सी संपात सहभागी होणार नसल्याने त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement