Tata Sons देणार चीनला दणका, भारतात बनणार Mobile Parts, तामिळनाडूत मोठा प्लांट उभारणार
भारतात मोबाईल प्रोडक्शनच्या 100 हून अधिक कंपन्या आहेत. मात्र मोबाईलचे पार्ट्स अजूनही बाहेरुन खासकरुन चीनवरुन मागवावे लागतात. मात्र आता या समस्येवर देखील तोडगा निघणार आहे. टाटा सन्स ही कंपनी आता देशात मोबाईलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : मोबाईलचे पार्ट्स विकण्यात नंबर एकवर असलेल्या चीनला टाटा ग्रुपनं अप्रत्यक्षपणे झटका देण्याची तयारी सुरु केली आहे. भारतात मोबाईल प्रोडक्शनच्या 100 हून अधिक कंपन्या आहेत. मात्र मोबाईलचे पार्ट्स अजूनही बाहेरुन खासकरुन चीनवरुन मागवावे लागतात. मात्र आता या समस्येवर देखील तोडगा निघणार आहे. टाटा सन्स ही कंपनी आता देशात मोबाईलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे.
माहितीनुसार टाटा सन्स ही कंपनी तामिळनाडूमध्ये मोबाईलचे पार्ट्स प्रोडक्शनचा एक प्लांट लावण्याची योजना बनवत आहे. या प्लांटमध्ये विदेशातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची देखील माहिती आहे. टाटाच्या या प्लांटमध्ये सर्वात आधी आयफोनचे पार्ट्स बनवले जाणार असल्याची माहिती आहे. मोबाईलचे पार्ट्स बनविण्याच्या प्लांटची योजना टाटा सन्स ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची असल्याची माहिती आहे.
चीनमधून कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अॅप्पलसारख्या अनेक विदेशी कंपन्या चीनबाहेर मोबाईल प्रोडक्शन कंपन्यांसाठी संधीच्या शोधात आहेत. अशात चंद्रशेखरन यांची योजना आहे की, या कंपन्यांसोबत जाऊन भारतात मोबाईल पार्ट्सची निर्मिती केली जावी. माहितीनुसार या मोबाईल पार्ट्सच्या निर्मितीची सुरुवात महागड्या आयफोनपासून होईल. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि जपानच्या ऑरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (ओईएम) सोबत भागीदारी केली जाणार आहे.
1.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज एका रिपोर्टनुसार टाटा कंपनीनं या प्रोजेक्टसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेण्याची तयारी केली आहे. यापैकी 75 कोटी ते एक अब्ज डॉलर्सची रक्कम एक्टर्नल कमर्शियल बॉरोइंग (ECB) च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. या नव्या प्लांटसाठी आणि कंपनीसाठी सीईओची देखील नियुक्ती केली जाणार आहे.
तामिळनाडू सरकारनं नुकतंच इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2020 घोषित केली आहे. या धोरणाचं लक्ष्य 2025 पर्यंत आऊटपुट वाढवून 100 अब्ज डॉलर करण्याचं आहे. जे त्यावेळी देशातील एकूण इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्टचा एक चतुर्थांश भाग असेल. टाटा इलेक्ट्रॉनिक्सला तामिळनाडू इंडस्ट्रिअल कॉरपोरेशनने होसूरमध्ये 500 एकर जमीन दिली आहे.