(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supreme Court: 'सर्वोच्च' इशाऱ्यानंतर मोदी सरकार अखेर नरमलं; पाच न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब, शपथविधी संपन्न
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात आज (6 फेब्रुवारी) पाच नव्या न्यायमूर्तींनी शपथ घेतली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या पाच न्यायमूर्तींना शपथ दिली.
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींचा शपथविधी आज पार पडला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी त्यांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court News) दिलेल्या इशाऱ्यानंतर मोदी सरकारला (Modi Government) नमती भूमिका घ्यावी लागली आहे. मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या नियुक्तीला अखेर हिरवा कंदील मिळाला. कायदे मंत्री किरण रिजीजू (Law Minister Kiren Rijiju) यांनी सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलेजियमवरून वादग्रस्त वक्तव्यं केली होती. किरण रिजीजू यांच्या वक्तव्यांच्या मालिकेमुळे केंद्र सरकार (Central Government) आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलाच वादाचा सामना रंगला होता. अखेर या सर्व प्रकरणाला पूर्णविराम मिळून पाच न्यायमूर्तींचा आज शपथविधी पार पडला.
मोदी सरकारकडून होत असलेल्या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यानंतर मोदी सरकारनं पाच न्यायमूर्तींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला आज (6 फेब्रुवारी) पाच नवे न्यायमूर्ती मिळाले आहेत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांनी त्यांना शपथ दिली. या पाच जणांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज मित्तल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.
पंकज मित्तल (Pankaj Mittal)
पंकज मित्तल यांचं मूळ कॅडर अलाहाबाद उच्च न्यायालय. पंकज मित्तल यांनी 1985 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली आणि उत्तर प्रदेश गृहनिर्माण आणि विकास मंडळाचे स्थायी वकील म्हणून काम केलं. 1990 ते फेब्रुवारी 2006 दरम्यान ते डॉ. बी. आर आंबेडकर विद्यापीठ, आग्राचे स्थायी वकील होते. न्यायमूर्ती मित्तल यांची 7 जुलै 2006 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती झाली. 2 जुलै 2008 रोजी त्यांनी स्थायी न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. त्यांनी 4 जानेवारी 2021 रोजी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी सामान्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
न्यायमूर्ती संजय करोल (Sanjay Karol)
आज शपथ घेणारे दुसरे न्यायमूर्ती करोल आहेत, ज्यांचे मूळ उच्च न्यायालयाचे कॅडर हिमाचल प्रदेश आहे. पदोन्नतीच्या वेळी ते पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती करोल यांचा जन्म 23 ऑगस्ट 1961 रोजी झाला. न्यायमूर्ती करोल यांनी उच्च न्यायालयासह विविध न्यायालयात प्रॅक्टिस केली. राज्यघटना, कर आकारणी, कॉर्पोरेट, फौजदारी आणि दिवाणी या विषयांमधील तज्ज्ञ आहेत. 1999 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
न्यायमूर्ती करोल हे 1998 ते 2003 पर्यंत हिमाचल प्रदेशचे महाधिवक्ता देखील होते. 8 मार्च 2007 रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली. त्यांची 25 एप्रिल 2017 पासून न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर, 9 नोव्हेंबर 2018 रोजी त्रिपुरा उच्च न्यायालय आणि 11 नोव्हेंबर 2019 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार (P. V. Sanjay Kumar)
न्यायमूर्ती कुमार हे मूळ तेलंगणा उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत. पाच न्यायमूर्तीच्या यादीत ते तिसरे आहेत आणि गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी कॉलेजियमने शिफारस केली आणि नंतर केंद्रानं मान्यता दिली तेव्हा ते मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले होते. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1963 रोजी झाला. हैदराबादच्या निजाम कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आणि 1988 मध्ये दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पदवी प्राप्त केली. न्यायमूर्ती कुमार यांनी ऑगस्ट 1988 मध्ये आंध्र प्रदेशच्या बार कौन्सिलचे सदस्य म्हणून नाव नोंदणी केली आणि 2000 ते 2003 पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केलं.
8 ऑगस्ट 2008 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून खंडपीठात पदोन्नती झाली आणि 20 जानेवारी 2010 रोजी त्यांनी न्यायालयाचे स्थायी न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला. न्यायमूर्ती कुमार यांनी 14 ऑक्टोबर 2019 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी 14 फेब्रुवारी 2021 रोजी मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला (Ahsanuddin Amanullah)
पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमानुल्ला हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले चौथे न्यायमूर्ती आहेत. त्यांचा जन्म 11 मे 1963 रोजी झाला. 27 सप्टेंबर 1991 रोजी त्यांनी बिहार राज्य बार कौन्सिलची सनद मिळाली आणि मार्च 2006 ते ऑगस्ट 2010 पर्यंत ते राज्य सरकारचे स्थायी वकील होते. 20 जून 2011 रोजी त्याच कोर्टात न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली. 10 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात आणि 20 जून 2022 रोजी पाटणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.
न्यायमूर्ती मनोज मिश्रा (Manoj Misra)
न्यायमूर्ती मिश्रा यांचा जन्म 2 जून 1965 रोजी झाला. त्यांनी 12 डिसेंबर 1988 रोजी वकिलीची सनद घेतली आणि 21 नोव्हेंबर 2011 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी 6 ऑगस्ट 2013 रोजी स्थायी न्यायमूर्ती म्हणून पदाची शपथ घेतली.