2000 Rs Note : ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बदलण्यास विरोध, तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय म्हटलं कोर्टाने?
2000 Rs Note: कायदेतज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ओळखपत्राशिवाय दोन हजारांची नोट बदलण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे.
2000 Rs Note: ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बदलण्याच्या आरबीआयच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. कोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने म्हटलं की, यापूर्वीही यावर एका खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सुट्टीनंतर सरन्यायाधीशांकडे सुनावणीसाठी अर्ज करावा.
'तात्काळ सुनावणी करण्याची गरज नाही'
याआधी 1 जून रोजी यासंदर्भात एका याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. कायदेतज्ञ अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के.वी विश्वनाथन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने म्हटलं होतं की, "या प्रकरणात तात्काळ सुनावणी करण्याची काही गरज नाही." तसेच खंडपीठाने याचिकाकर्त्यांना उन्हाळी सुट्ट्यांनंतर सुनावणीसाठी अर्ज करण्यास याचिकाकर्त्यांना सांगितले होते.
दिल्ली उच्च न्यायलयाने फेटाळली होती याचिका
उपाध्याय यांनी सर्वात आधी ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बदलण्याची परवानगी देणाऱ्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायलयातील न्यायमूर्ती सतीश कुमार शर्मा आणि न्या. सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सुनावणी करण्यात आली होती. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मागील वेळेस त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन म्हटलं होतं की, "भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा निर्णय चुकीचा असून उच्च न्यायालयाने त्याला मंजुरी देऊन चूक केली आहे."
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) केलेल्या घोषणेनंतर बँकांकडून देखील काही नियामावली जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची परवानगी देण्यासाठी एसबीआयने सर्व मुख्य शाखांना पत्र देखील लिहिले होते. तसेच नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण न करण्यासाठी बँकांकडून यासंदर्भात वेळोवेळी नियमावली देखील जाहीर करण्यात येत आहे.
दोन हजारांची नोट चलनातून परत घेण्याचा निर्णय
दरम्यान, दोन हजाराची नोट चलनातून परत घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केला आहे. चलनातील या दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही बँकेत जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतातल्या सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत जेवढ्याही दोन हजाराच्या नोटा जमा होतील त्या सर्व 2000 च्या नोटा आरबीआयकडे परत पाठवल्या जाणार आहेत.