(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan-3 : 'आता काहीही होऊ दे विक्रम लँडर चंद्रावर उतरणारच', इस्रोच्या प्रमुखांची माहिती
Chandrayaan-3 : चांद्रयान 3 बद्दल इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली असून चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वी उतरणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Chandrayaan-3 : विक्रम लँडरचे (Vikram Lander) हे अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की कोणतीही अडचण आली तरी ते चंद्रावर यशस्वीरित्या लँड होण्यास सक्षम असल्याचं इस्रोच्या प्रमुखांनी मंगळवारी म्हटलं आहे. इस्रोचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी 'चांद्रयान-3 - इंडियाज प्राइड स्पेस मिशन' या विषयावरील चर्चासत्रात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. भारताच्या तिसऱ्या चांद्रयान मोहीमेतील विक्रम लँडर हे 23 ऑगस्ट पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याचा अंदाज इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले इस्रो प्रमुख?
मंगळवार (8 ऑगस्ट) रोजी चांद्रयान-3 - इंडियाज प्राइड स्पेस मिशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-3 या भारताच्या महत्त्वपूर्ण मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आता अगदी चांद्रयान -3 च्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्याचे सेन्सॉर गेले तरी विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सक्षम असणार आहे. त्याची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे.' त्यामुळे आता काहीही झालं तरी चांद्रयान-3 हे चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वास डॉ. एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे.
चांद्रयान-3 हे 14 जुलै रोजी अवकाशात झेपावले आणि त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी त्याने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. तसेच अजून तीन डी-ऑर्बिटिंग कक्षा या यानाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे हे यान 23 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.
विक्रम लँडरचं आव्हान
इस्रोसाठी विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. चांद्रयान-2 मधील मोहिमेत विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यास इस्रोला अपयश आलं होतं. त्यामुळे आता चंद्राच्या कक्षा पूर्ण केल्यानंतर या यानाचे इंजिन बंद केले जाते. त्यामुळे त्याचा वेग देखील मंद होतो, अशी माहिती देखील इस्रोच्या प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे या इंजिनमध्ये बिघाड जरी झाली तरी विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यास सक्षम होणार आहे.
चांद्रयान-3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राचा पहिला फोटो पाठवला. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश होतं. जर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानचे सॉफ्ट लॅंडिंग यशस्वी झाले, तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे.