Shivsena : पंजाबच्या हिंदूंमध्ये शिवसेना, बाळासाहेबांचं आकर्षण नेमकं आलं कुठून? पंजाबमध्ये 15-16 शिवसेना नावाच्या संस्था
Sudhir Suri Shot Dead : सुधीर सुरी या शिवसेना नेत्याची पंजाबमध्ये हत्या झाली. या हत्येनंतर सगळ्यांच्याच कुतूहलाचा प्रश्न म्हणजे पंजाब आणि शिवसेनेचं नातं नेमकं आहे तरी काय?
नवी दिल्ली: पंजाबमध्ये काल एका शिवसेना नेत्याच्या हत्येनं राजकीय वातावरण तापलं. सुधीर सुरी (Sudhir Suri)असं या नेत्याचं नाव. पण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा आणि याचा थेट संबंध नाही. पण पंजाबमधल्या हिंदुंमध्ये शिवसेनेचं नेमकं आकर्षण कुठून आलं याचा शोध घेतला तर एक नवीच माहिती समोर आलीय.
पंजाबमध्ये सुधीर धुरी या शिवसेना नेत्याची पंजाबमध्ये हत्या झाली. या हत्येनंतर सगळ्यांच्याच कुतूहलाचा प्रश्न म्हणजे पंजाब आणि शिवसेनेचं नातं नेमकं आहे तरी काय? ज्या सुधीर धुरी याची काल हत्या झाली त्याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. पण तरीही पंजाबमध्ये अशा अनेक संघटना शिवसेना नावानं आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 15-16 शिवसेना एकट्या पंजाबमध्ये आहेत.
मागच्या सहा महिन्यांपूर्वीही दोन धार्मिक गटातल्या वादात पंजाबमधल्या शिवसेनेचं नाव समोर आलं होतं. पतियाळामध्ये त्यावरून हिंसाही झाली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनीच शोध घेतला तर त्यांच्या लक्षात आलं की अशा अनेक संघटना, त्यातल्या काही तर नोंदणीकृत नाहीत. पण त्या सगळ्या शिवसेनेच्या नावानं चालतायत.
पंजाबमध्ये इतक्या शिवसेनांचं पेव फुटलं तरी कसं?
पंजाबमध्ये 15 ते 16 शिवसेना नावानं संघटना आहेत. या संघटनांचा शिवसेना पक्षाशी कुठलाही संबंध नाही यांची नावं पण फार भारी आहेत. शिवसेना ( हिंदू), शिवसेना ( पंजाब), शिवसेना ( टकसाली) शिवसेना ( हिंदुस्थान), शिवसेना ( शेर ए हिंद), शिवसेना ( शेर ए पंजाब), शिवसेना ( समाजवादी) अशा नावानं या संघटना आहेत
पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ जोमात होती, त्याच काळात म्हणजे 1980 च्या दशकात या शिवसेना संघटनांचा जन्म झाला. शीखांच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी पंजाबमधल्या हिंदुंनी थेट बाळासाहेबांच्याच लोकप्रियतेचा वापर करुन स्वत: आपली आपली शिवसेना स्थापित केली. काल सुद्धा एका धार्मिक वादाच्या आंदोलनातच सुधीर धुरी याची हत्या झाल्याचं कळतंय. एका मंदिराबाहेर आंदोलन सुरु असतानाच गर्दीतून एकानं त्याच्यावर गोळीबार केला. शिवसेना टकसाळी या स्वयंस्थापित संघटनेचा तो सदस्य होता.
महाराष्ट्रात सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. पण त्याच्या कितीतरी आधी पंजाबमध्ये हे इतके गट शिवसेना नावानं अस्तित्वात आहेत. अर्थात यांची निवडणुकीवेळी कधी चर्चा होत नाही. ते राजकीयदृष्टया फार सक्रियही नाहीत. पण पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीवेळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मानत सुरु झालेले हे गट असे कधीमधी चर्चेत येत राहतात.
हिंदुत्वाचा ब्रँड नेमका कुणाचा यावरुन शिवसेना भाजपमध्ये सतत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात पंजाबमधल्या हिंदुची बाळासाहेबांच्या नावावरची आस्था, शिवसेना नाव वापरण्याची स्पर्धा बरंच काही सांगणारी आहे.