(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covishield लस सुरक्षित आहे, पण बुलेटप्रूफ नाही- अदर पुनावाला
एकिकडे या लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच तिथं विरोधी पक्षांनी मात्र या लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उभं केलं. पण, सीरमचचे सीईओ अदर पुनावाला यांनी लसीच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली.
Covishield आणि कोवॅक्सिन या लसींना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) नं रविवारी आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. या मोठ्या घोषणेनंतर संपूर्ण देशालाच एक मोठा दिलासा मिळाला. भारतात कोरोनावरील लसींच्या आपातकालीन वापरासाठी मान्यता मिळताच जागतिक स्तरावरून या निर्णयाचं स्वागत झालं. इथं देशातही पंतप्रधानांसह अनेक नेतेमंडळींनीही या निर्णय़ाचं स्वागत केलं. कोरोनाशी लढण्यासाठी उचलण्यात आलेल्या या पावलाचं जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कौतुक झालं.
एकिकडे या लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच तिथं विरोधी पक्षांनी मात्र या लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उभं केलं. तिसऱ्या ट्प्प्यातील चाचण्यांच्या अहवालाशिवाय लसीला मान्यता देण्यात आल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबाबत सीरमचे सीईओ (adar poonawala ) अदर पुनावाला यांनी लसीच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली.
ABP Newsला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी लसीबाबतच्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. कोरोनाची लस नेमकी कितपत सुरक्षित आहे, या प्रश्नाचं उत्तर देत त्यानी ही लस ऑक्सफर्डमधील काही निष्णांत शास्त्रज्ञांनी विकसित केल्याची बाब अधोरेखित केली. शिवाय लसीबाबचा सर्व तपशील हा अनेक टप्प्यातील पडताळणीनंतरच हाती आल्याचंही ते म्हणाले. शिवाय या लसीला युकेमध्येही मान्यता मिळाली असून, आपल्या परिनं सर्व निकषांवर लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आल्याचा विश्वास त्यांनी दिला.
Corona Vaccine | केव्हा आणि कधी मिळणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
लस घेतल्यानंतर होणाऱ्या काही परिणामांबाबत सांगताला, हलकी डोकेदुखी, किंवा किरकोळ ताप जाणवू शकतो. पण, अशा वेळी पॅरासिटामोलच्या गोळीनं परिस्थिती नियंत्रणात येईल, त्यासाठी चिंता करण्यातं किंवा गोंधळण्याचं कारण नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.लस घेतली तरीही काळजी महत्त्वाचीच...
लसीच्या पहिल्या मात्रेनंतर अर्थात पहिल्या डोसनंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगताना ते म्हणाले, लसीची पहिली मात्रा किंवा पूर्ण डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर हा बंधनकारकच आहे. कारण, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग नाकारता येत नाही. कारण, ही लस काही बुलेटप्रूफ नाही. त्यामुळं सावधगिरी म्हणून मास्कचा वापर हा झालाच पाहिजे.
येत्या काही आठवड्यात लसीकरणाची मोहीम सुरु होणार
येत्या काही आठवड्यात भारतात कोरोना लसीकरणाची पहिली मोहीम सुरु होईल, असंही अदर पुनावाला यांनी सांगितलं. पुनावाला म्हणाले की, "सीरम इन्स्टिट्यूटने धोका पत्करुन लस बनवण्याचा निर्णय घेतला होता, आता तो योग्य असल्याचं वाटतं." "ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहेच असं सांगताना लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(Coronavirus) चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीचे अनेक प्रयत्न सुरु असतानाच आता लसींच्या आपातकालीन वापराला मिळालेली परवानगी हा देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. असं असलं तरीही बेफिकीरीनं वर्तन करत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करण्याची हेळसांड करु नका असाच आग्रही सूर पुनावाला यांनी आळवला.