Covishield : कोविड थोडासा निवळला, लसीकरणाकडे लोकांची पाठ;सीरमला 10 कोटी डोस फेकून देण्याची वेळ
Adar Poonawalla : कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे 10 कोटी डोस फेकून द्यावे लागले, अशी माहिती आदर पूनावाला यांनी दिली.
Adar Poonawalla On Covishield Vaccine : कोरोना महामारीचा वेग थोडासा वेग मंदावल्यानंतर लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. त्यामुळे बूस्टर डोसची मागणी कमी झाली आहे. कंपनीने डिसेंबर 2021 पासून कोविशिल्ड लसीकरणाची निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे मुदत संपलेले 10 कोटी कोविशिल्ड लसीचे डोस फेकून द्यावे लागले, अशी माहिती सीरम इन्स्टिट्युटचे आदर पूनावाला यांनी दिली आहे. भारतामध्ये नवीन कोरोना व्हेरियंट समोर आला असतानाच आदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठात गर्दी झाली आहे, त्यातच देशात नवीन व्हेरियंट आला आहे, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. लोकांना कोराना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
आदर पूनावाला यांनी देशात कोरोना लसीकरणाच्या बूस्टर डोसची मागणी कमी झाल्याचं म्हटले आहे. विकसनशील देशाच्या वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क (DCVMN)या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. 75 दिवसांसाठी देशभरात मोफत लसीकरण करण्यात आले होते, तरीही हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाचा जोर ओसरल्यामुळे लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.
डिसेंबर 2021 पासून कंपनीनं कोविशिल्ड लसीकरणाचं उत्पादन बंद करण्यात आल्याची माहितीही पूनावाला यांनी दिली. लसीकरणाची निर्मिती बंद केल्यानंतर कंपनीकडे लाखो लसीकरणाचे डोस होते. मुदत संपलेले तब्बल 10 कोटी लसीचे डोस फेकून द्यावे लागल्याचे पूनावाला यांनी सांगितले.
पूनावाला म्हणाले की, दोन आठवड्यामध्ये कोवॅक्स लसीला (Covovax vaccine) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. दोन लसींचे डोस एकत्र करणाऱ्या बूस्टर डोसला सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं परवानगी दिल्यानंतर भारतीय सरकारकडूनही याला मान्यता मिळेल. दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचा दाखला देत सरकारने विदेशातून लस आयात करण्यावर बंदी घातली आहे.
भारतामध्ये किती लसीकरण झालं?
शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.50 (2,19,50,97,574) कोटींची संख्या ओलांडली आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,13,682) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 25,037 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.