Sarhad Kargil Marathon : एक धाव, भारतातल्या शेवटच्या गावासाठी, 'युद्धभूमी'त धावणार जगभरातले धावपटू; सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं 17 आणि 18 सप्टेंबरला आयोजन
Sarhad Kargil Marathon : कारगिलमध्ये देश-विदेशांतील धावपटूंचे आकर्षण असणारी 'सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2023' यंदा 17 आणि 18 सप्टेंबरला होणार आहे. 17 सप्टेंबरला ही मॅरेथॉन मुख्य स्पर्धा पार पडणार आहे.
मुंबई : यंदाचे कारगिल विजय दिवसाचे (Kargil Vijay Divas) रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कारगिलमध्ये देश-विदेशांतील धावपटूंचे आकर्षण असणारी 'सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2023' यंदा 17 आणि 18 सप्टेंबरला होणार आहे. 17 सप्टेंबरला ही मॅरेथॉन मुख्य स्पर्धा पार पडणार आहे. 18 सप्टेंबरला ओपन मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉनची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. देश-विदेशातून अनेक धावपटू या मॅरेथॉनमध्ये यंदा सहभागी होणार आहेत. विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षीसं या मॅरेथॉन स्पर्धेत मिळणार आहेत. कारगिल विजय दिवसाचे रौप्य महोत्सवी वर्ष निमित्ताने विविध उपक्रम पुण्यातील सरहद संस्थेकडून (Sarhad) वर्षभर राबवण्यात आलेले आहेत.
आबालवृद्ध सगळेच धावणार
'सरहद, पुणे' संस्थेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून कारगिल येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या मॅरेथॉनची रन फॉर हुंदरमन अशी संकल्पना आहे. कारगिलमधील पर्यटनासाठी आणि विकासासाठी या स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला हे दोन गट असणार आहेत. यंदा या मॅरेथॉनमध्ये विशेष म्हणजे फुल आणि हाफ मॅरेथॉन सह या स्पर्धेत यावर्षी नव्याने समावेश करण्यात आलेल्या 16 आणि 18 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या दोन आणि तीन किलोमीटरच्या देखील स्पर्धा असणार आहेत. या स्पर्धेमध्ये लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत. 2000 पेक्षा अधिक लोक यामध्ये सहभागी होणार आहेत.
अशी असेल कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
यंदा कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2023 स्पर्धा ही ख्रि सुलतान चो स्टेडियम ते सालीसकोटे गावातील सालीसकोटे हायस्कूल अशी 42. 195 किलोमीटर अशी फुल मॅरेथॉन असणार आहे. ख्रि सुलतान चो स्टेडियम ते टिक मिक पोल नंबर 490 अशी 5 किलोमीटरची मॅरेथॉन असणार आहे. स्टोन क्रशर कंपनी 441 पर्यंत 10 किलोमीटर मॅरेथॉन असणार आहे. मिंजी गाव पोल नंबर 324 पर्यंत 21.0975 किलोमीटर हाफ मॅरेथॉन असणार आहे. ही स्पर्धा सकाळी साडे सहावाजता सुरु होणार आहे.
कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2023
सरहद, पुणे संस्था, भारतीय सैन्य दल, सचिव आणि कारगिलचे जिल्हा विभाग, लडाख अटोनिमिस हिल्स डेव्हलपमेंट कौन्सिल टेक्निकल रेस डायरेक्टरस तसेच ‘कारगिल’चे शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी, लडाख पोलिस , स्थानिक लोकं, कारगिल हिल डेवलपमेंट काऊंसिल, लद्दाख खेल विभाग यांनी या स्पर्धेचे आयोजन करत सर्व दृष्टीने तयारी केली आहे. मॅरेथॉन मार्गावर तांत्रिक दृष्ट्या करण्यात आलेल्या व्यवस्थेची तसेच वैद्यकीय व्यवस्था, पिण्याचे पाणी, फळांचे रस, सायकलिंग संघटनेचे पायलटस, मार्गावरील वाहतूक सहा तास बंद करण्याची व्यवस्था आदीं खबरदारी आणि उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
रन फॉर हुंदरमन
'सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे 2017 साली पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन हे एकतेचे प्रतीक आहे. हुंदरमन हे कारगिलचं शेवटचं आणि पाकिस्तान व भारताच्या सीमेवरचं गाव आहे. ते गावचं नव्हे आपल्या सैन्याचं शौर्य आणि गावकऱ्यांच्या चिकाटीचे प्रतीक आहे. याच गावाच्या विकासासाठी आणि पर्यटनासाठी सरहद संस्थेने यंदा रन फॉर हुंदरमन कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सरहद संस्थेबद्दल
सरहद ही एक स्वयंसेवी संस्था आहे. जी गेल्या 32 वर्षांपासून भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये शांततेसाठी कार्यरत आहे. सध्या छोट्या प्रमाणावर संस्था असली तरी, सीमावर्ती भागातील मुलांना प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण देण्यासाठी, त्यांच्या कौशल्याचा विकासासाठी ही संस्था काम करत आहे. सीमावरती भागामध्ये विविध उपक्रम सरहद संस्थेकडून राबवले जातात.