एक्स्प्लोर
दहशतवाद्यांचे मनोबल वाढवण्याचं काम करू नका : सामना
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ने भोपाळ चकमकीतील पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. मात्र, सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवादी तुरुंगातून पसार कसे होतात, असा सवालही 'सामना'तून विचारला गेला आहे. 'भोपाळातील फटाके' या लेखातून सुरक्षाव्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल, असा सवाल विचारण्यात आला आहे.
भोपाळातील फटाके
''दिवाळी असली तरी मुंबईत फटाक्यांना बंदी आहे. फटाके वाजत नसल्याने दिवाळीचा मामला थंड पडला. पण मध्य प्रदेशात भोपाळ येथे जोरदार फटाके वाजले व संपूर्ण देशात त्या फटाक्यांचा आवाज घुमला आहे. कदाचित भोपाळमधील फटाक्यांचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून ‘सिमी’चे आठ अतिरेकी पळून गेले. त्या सर्व अतिरेक्यांना आता गोळ्या घालून यमसदनी पाठविण्याचे शौर्य पोलिसांनी गाजवले आहे. भोपाळच्या रस्त्यांवर आठ अतिरेक्यांचे मुडदे छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व आपल्याच देशातील काही लोक त्या मुडद्यांसाठी ‘मातम’ करीत आहेत. ‘पोलिसांनी काय हे क्रौर्य केले? पोलिसांनी काय हे अमानुष व निर्घृण काम केले?’ असे वक्तव्य करून दहशतवाद्यांचे मनोबल वाढविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. अर्थात भोपाळात जे घडले त्यास दुसरी बाजू आहे. ‘सिमी’चे आठ अतिरेकी सेंट्रल जेलमधून पळून जातात हे सरकारसाठी लांच्छनास्पदच होते. राष्ट्रीय सुरक्षेचा हा खेळखंडोबाच आहे. त्याचे समर्थन कोणी करू नये. भारतीय जनता पक्षाचे राज्य येऊनही प्रभू श्रीरामांचा वनवास संपला नाही. अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत राजकीय टोलवाटोलवी सुरू आहे. राम आजही वनवासातच असला तरी
देशाची सुरक्षा व्यवस्था मात्र
रामभरोसे आहे हे भोपाळच्या ‘तुरुंग’फोडीनंतर उघड झाले. दिवाळीच्या धामधुमीचा फायदा घेत तुरुंगातून पळून जाण्याचा कट ‘सिमी’च्या आठ भयंकर अतिरेक्यांनी रचला व त्यात ते यशस्वी झाले. रामशंकर या तुरुंग रक्षकाची गळा चिरून हत्या केली. चादरीचा दोरासारखा वापर करून भिंतीवरूनच उड्या मारून सिमीचे हे अतिरेकी पसार झाले, पण भोपाळपासून जवळच पोलिसांनी त्यांना घेरले व ठार केले. प्रश्न इतकाच आहे की, अतिरेकी चकमकीत मारले गेले म्हणून सरकारचे कौतुक करायचे, की तुरुंग फोडून अतिरेकी पळून गेले म्हणून सरकारला जोडे हाणायचे? हिंदी सिनेमात असे प्रसंग नेहमीच पाहायला मिळतात. तुरुंगाचे लोखंडी गज वाकवून किंवा उंच भिंतीवरून पलीकडे उडी मारून खलनायक फरारी होतो. पण हे असे फक्त हिंदी सिनेमांतच घडू शकेल. प्रत्यक्षात हे शक्य नाही, असे सांगून आपणच आपले समाधान करून घेत असतो. पण फक्त सिनेमातच नाही तर प्रत्यक्षात हे असले प्रकार घडू शकतात हे भोपाळच्या घटनेने दाखवून दिले. हे आठही दहशतवादी ‘सिमी’चे आहेत व त्यांचे कारनामे राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात इतकी मोकळीक कोणी मिळवून दिली? मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सुशासन अनेक वर्षांपासून आहे व मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तर विजयाची हॅटट्रिकच केली आहे. त्यामुळे भोपाळ तुरुंगातून आठ दहशतवादी पळाले
याचे खापर काँग्रेसवर
फोडता येणार नाही व राहुल गांधी यांना राज्य कारभाराचे ज्ञान नाही अशी पुडी कुणाला सोडता येणार नाही. आठ दहशवाद्यांनी पलायन केल्यावर सर्वत्र ‘हाय अॅलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. हा मोठाच विनोद आहे. हे आठ अतिरेकी पळून जाऊन काय करतील व त्यांचे मनसुबे काय असतील, हे सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून ते हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावतील व त्यासाठीच त्यांनी पलायन केले. हा मोठा कट असावा. बाहेरून त्यांना मदत झाली आहे व याबाबत माहिती मिळवण्यात आपली सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग कुचकामी ठरला आहे. भोपाळ तुरुंगात अनागोंदी होती व भिंती कमकुवत असल्याचे आता उघड झाले आहे हेसुद्धा गंभीरच आहे. भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल? इशरत जहां प्रकरणाची पुनरावृत्ती भोपाळच्या रस्त्यांवर झाली. चकमक खरी की खोटी, यावर तोंडाची डबडी वाजवणार्या निधर्मीवाद्यांना शेवटी इतकेच सांगायचे आहे की, भोपाळची चकमक खरी असेल तर पोलिसांना हजार सलाम आणि दिग्विजय सिंहांसारखे लोक म्हणतात त्याप्रमाणे, चमकम ‘बनावट’ असली तरी देशाविरुद्ध कट रचणारे व बॉम्ब बनवणारे लोक मारले गेले आहेत हे विसरू नये व पोलिसांना बदनाम करू नये!''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement