एक्स्प्लोर
गायिका नाहिद आफरीनच्या समर्थनासाठी सलीम खान मैदानात !

मुंबई : आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात आपल्या गाण्याच्या माध्यमातून एल्गार काढणाऱ्या नाहिदविरोधात 46 आसामी मौलवींनी फतवा काढला आहे. या फतव्याला विरोध करत ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांनी नाहिद आफरीनचं समर्थन केलं आहे. शिवाय, अशाप्रकारे फतवे काढणाऱ्यांना सलीम खान यांनी चांगलेच धारेवर धरलं.
“फतवा काढणाऱ्यांना कदाचित माहित नसेल, फतवा म्हणजे न्यायालयीन निर्णय किंवा कोणत्या इस्लामिक विचारवंताचं मत नाही. किंबहुना, मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टीविरोधात फतवा काढला नाही.”, असे सलीम खान म्हणाले. शिवाय, या मौलवींमुळे इस्लामच्या अनुयायांना शरमेनं मान खाली घालावी लागते, अशी टीका सलीम खान यांनी केली.
सलीम खान पुढे म्हणाले, “माध्यमं त्यांना मौलवी म्हणतात आणि या कथित मौलवींची योग्यताही नसते, इतकं त्यांना महत्त्वं आणि आदर देतात.”
काय आहे फतवा?
’25 मार्चला आसामच्या लंका भागातील ‘उदाली सोनाई बिबी कॉलेज’मध्ये नाहिद ही गायिका शरियाच्या विरोधात गाणं गाणार आहे. मस्जिद, इदगाह, मदरसे आणि स्मशानभूमीने वेढलेल्या कॉलेजच्या या मैदानात शरिया-विरोधी म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली तर आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या मनात अल्लाविषयी राग निर्माण होईल.’ असं या फतव्यात म्हटलं आहे.
16 वर्षांची नाहिद आफरीन दहावीची विद्यार्थिनी असून आसामच्या बिश्वनाथ चरियाली भागात राहते. आपल्याविरोधात काढलेल्या फतव्यामुळे तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ‘मी निशब्द झाली आहे. संगीत ही माझ्यासाठी देवाची देणगी आहे. त्यामुळे मी अशा धमक्यांना भीक घालणार नाही, त्याच्यापुढे झुकणार नाही. माझं गाणं कधीच सोडणार नाही.’ असं नाहिद म्हणते.
कार्यक्रमाच्या आयोजकांनीही मैफल रद्द करण्यास नकार दिल्याचं नाहिदच्या आईने सांगितलं आहे. नाहिद आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे. 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाची भूमिका असलेल्या ‘अकिरा’ चित्रपटासाठी पार्श्वगायन करुन तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
