यंदाच्या दिवाळीत 72 हजार कोटींपेक्षा जास्त विक्री, चीनचं मोठं नुकसान
यंदा दिवाळीला सुमारे 72 हजार कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. तर चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याने चीनला थेट 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटीने ही माहिती दिली.
मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र तरीही यंदा दिवाळीला देशभरातील बाजारातील विक्रीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली. यावर्षी दिवाळीला बाजारात सुमारे 72 हजार कोटी रुपयांची विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे. तर यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याने चीनला थेट 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटीने ही माहिती दिली.
लोकांनी मागील आठ महिन्यात अत्यावश्यक वस्तूंशिवाय काहीही खरेदी केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे होते. त्यापैकी काही भाग त्यांनी दिवाळीच्या सणासाठी खर्च केला, असं सीएआयटीचे राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितंल.
कॅटने एका प्रसिद्धीपत्रात म्हटलं की, 20 वेगवेगळ्या शहरांमधील अग्रगण्य वितरण केंद्रातून जमा केलेल्या अहवालानुसार, दिवाळीच्या सणात जवळपास 72 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सूरत, कोचीन, जयपूर, चंडीगडसह वीस शहरांना वितरणाची प्रमुख केंद्र समजलं जातं.
CAIT म्हटलं आहे की, दिवाळीच्या सणादरम्यान बाजारांमध्ये झालेली जबरदस्त विक्री भविष्यात स्थानिक व्यापाराच्या चांगल्या शक्यतेचे संकेत देतात. आता देशभरातील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसं समाधान दिसू लागेल. 72 हजार कोटींच्या विक्रीत एफएमसीजी वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, खेळणी, विजेची उपकरणे आणि साधनं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, स्वयंपाकघरातील वस्तू, भेटवस्तू, मिठाईसाठी लागणाऱ्या वस्तू, मिठाई, घराच्या सजावटीच्या वस्तू, भांडी, सोनं आणि दागिने, चप्पल, घड्याळं, फर्निचर, दिवाळीला सर्वाधिक खरेदी केलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे. कपडे, होम डेकोरेशनच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.
चीनला मोठं नुकसान भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या हिंसक झडपेनंतर सीएआयटीने चीन वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. यंदा दिवाळीला त्याचा परिणाम दिसू लागला. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या माहितीनुसार, यंदा चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून भारतीय दिवाळी साजार करण्याच्या कॅटच्या अभियानला देशव्यापी पाठिंबा मिळाला. "देशाचे व्यापारी आणि लोकांनी चिनी वस्तू खरेदी न केल्याने चीनला 40 हजार कोटी रुपयांचा जोरदार झटका दिला. चीनसाठी हा कठोर संदेश आहे की, त्यांनी भारताला डम्पिंग यार्ड समजू नके आणि भारताच्या रिटेल व्यवसायावर ताबा मिळवण्याच्या त्यांच्या उद्देशाला सडेतोड उत्तर दिलं जाईल. कॅटच्या प्रयत्नांमुळे यंदा पहिल्यांदाच दिवाळीला मोठ्या संख्ये स्थानिक कामगार, मूर्तीकार, हस्तशिल्प मजूर आणि विशेषत: कुंभारांनी बनवलेल्या उत्पादनांना मोठा बाजार मिळाला आणि त्यांनीही चांगला व्यवसाय केला.
Kolhapur market | 'बाजारपेठ की कोरोनापेठ' कोरोना असतानाही कोल्हापूरमध्ये खरेदीसाठी झुंबड