Mohan Bhagwat : नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणार? मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलं, संघाने आदेश दिला तर...
Mohan Bhagwat On Modi Retirement : भाजपबाबत संघ सर्वकाही ठरवतो यात तथ्य नाही, भाजपला संघ फक्त सल्ला देऊ शकतो, निर्णय घेत नाही असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाच्या 75 व्या वर्षानंतर राजकारणात सक्रिय राहणार की निवृत्ती घेणार या चर्चांना अखेर सरसंघचालक मोहन भागवतांनी (Mohan Bhagwat) पूर्णविराम दिला आहे. मी किंवा एखाद्याने 75 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी असं मी कधीही म्हटलो नाही, संघाने आदेश दिला तर मी निवृत्ती घेईन असं मोहन भागवत म्हणाले. संघाला गरज असेल तोपर्यंत मी कार्यरत राहणार असंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या अखेरच्या दिवशी मोहन भागवतांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मोहन भागवत यांनी यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील, अशा चर्चांना भागवतांनी स्पष्टपणे फेटाळले.
संघ सांगेल तसा निर्णय घेऊ
पत्रकारांशी संवाद साधताना मोहन भागवत म्हणाले, "मी कधीही असं म्हटलं नाही की 75 वर्षांनंतर निवृत्त व्हायलाच पाहिजे. संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू. कुणी 80 व्या वर्षी मला शाखेत काम करायला सांगितलं तर ते मला करावं लागेल. निवृत्ती ही वैयक्तिक गोष्ट नाही, तर संघाच्या कार्याशी जोडलेली आहे. मी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी निवृत्तीचा निर्णय दिला नाही. आम्ही कधीही निवृत्त होण्यासाठी तयार आहोत, तसेच संघाला आमची गरज असेपर्यंत काम करण्यासाठीही तयार आहोत."
भाजपला सल्ला देऊ शकतो
भाजपबद्दल संघ सगळं ठरवतो यात काहीच तथ्य नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. आम्ही भाजपला सल्ला देऊ शकतो, पण निर्णयाचा अधिकार पक्षाचाच असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही निर्णय घेतले असते तर इतका वेळ लागला नसता, असं सूचक वक्तव्यही भागवत यांनी केलं. भाजपचा अध्यक्ष ठरवण्यात संघाची भूमिका आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं.
घुसखोरीवर कठोर भूमिका
घुसखोरीच्या (Infiltration) मुद्द्यावर भाष्य करताना भागवत म्हणाले, "घुसखोरी थांबवलीच पाहिजे. सरकार प्रयत्न करत आहे, हळूहळू पुढेही जात आहे. पण समाजाने ठरवले पाहिजे की आपल्या देशातील रोजगार (Jobs) आपल्या नागरिकांनाच मिळाला पाहिजे. आपल्या देशात मुस्लिम (Muslims in India) नागरिक आहेत, त्यांनाही रोजगाराची गरज आहे. पण बाहेरून आलेल्यांना रोजगार का द्यायचा? त्यांनी त्यांच्या देशात काम करायला हवं."
मोदींच्या निवृत्तीवर पडदा
पंतप्रधान मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडतील, या चर्चांना भागवतांच्या विधानानं पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे मोदींच्या राजकीय कारकिर्दीबाबत स्पष्टता आली आहे.
ही बातमी वाचा:
























