Kerala CM Pinarayi Vijayan On Ram Mandir : धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा पुसट होत आहे; केरळच्या मु्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
Kerala CM Pinarayi Vijayan On Ram Mandir : आता अशी वेळ आली आहे की देशातील कोणत्याही धार्मिक स्थळाचे उद्घाटन हे राजकीय कार्यक्रमात रुपांतरीत होऊ लागले आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले.
Kerala CM Pinarayi Vijayan On Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात असलेल्या सरकारच्या भूमिकेवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी जोरदार टीका केली. धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा सतत पातळ होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर काही तासांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या मुद्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आता अशी वेळ आली आहे की देशातील कोणत्याही धार्मिक स्थळाचे उद्घाटन हे राजकीय कार्यक्रमात रुपांतरीत होऊ लागले आहे.
ते पुढे म्हणाले की आमच्या घटनात्मक अधिकार्यांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या अशा सहभागामुळे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल असेही त्यांनी म्हटले.
जवाहरलाल नेहरूंचे केले स्मरण
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे स्मरण करताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन पुढे म्हणाले, “नेहरू अनेकदा म्हणायचे की भारतीय धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म आणि सरकार वेगळे ठेवणे. ते वेगळेपण जपण्याची आपल्याकडे एक मजबूत परंपरा आहे.मात्र, धर्म आणि सरकार यांच्यातील सीमारेषा अधिक पुसट होत आहे. त्यामुळे ज्यांनी भारतीय राज्यघटनेची शपथ घेतली आहे त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा समान अधिकार आहे.
'हा देश सर्व धर्माच्या लोकांचा आहे'
विजयन यांनी म्हटले की, आपण एक धर्म इतर सर्वांवर लादू शकत नाही किंवा एका धर्माचे दुसर्या धर्मापेक्षा कनिष्ठ म्हणून मूल्यांकन करू शकत नाही. ते म्हणाले की धर्मनिरपेक्षता हा भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकचा आत्मा आहे आणि आपल्या स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीदरम्यान एक राष्ट्र म्हणून आमची ओळख आहे.
आपल्या स्वातंत्र्यलढ्यात विविध धर्माचे लोक आणि कोणत्याही धर्माचा भाग नसलेल्या लोकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. हे राष्ट्र सर्व लोकांचे आणि भारतीय समाजातील सर्व घटकांचे असल्याचेही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले.