राजस्थानमध्ये 45 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट चंबळ नदीत उलटली!
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात 45 प्रवासी असलेली बोट चंबळ नदीत उलटल्याने मोठा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव दलाने 20 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. तर तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. बचावकार्य अद्याप सुरु आहे.
कोटा : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात सुमारे चार डझनपेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली बोट चंबळ नदीत उलटल्याने मोठा अपघात झाला. या बोटीत जवळपास 45 प्रवाशांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव दलाने 20 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. तर तीन जणांचे मृतदेह (दोन पुरुष आणि एक महिला) सापडल्याची माहिती इटावाचे उपविभागीय दंडाधिकारी रामावतार बरनाला यांनी दिली. अपघाताचं गांभीर्य पाहता पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरु आहे.
कमलेश्वर धाम दर्शनासाठी जाताना अपघात मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात खातौली परिसरात आज (16 सप्टेंबर) सकाळीच गोठड़ा कला गावाजवळ घडला. अपघातामधील प्रवासी कमलेश्वर धाम दर्शनासाठी जात होते. याचवेळी अचानक नाव उलटली आणि सगळे पाण्यात बुडाले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि मदत-बचाव दला घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्यात बुडालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी बचाव कार्य सुरु आहे.
असा घडला अपघात! स्थानिकांच्या माहितीनुसार आज चतुर्दशीचा दिवस आहे. यामुळे कोटा जिल्ह्याच्या गोठडा गावातून चंबल नदीच्या एका किनाऱ्यावरुन काही भाविक दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या बुंदी जिल्ह्यातील कमलेश्वर धाम दर्शन आणि स्नानासाठी जात होते. यावेळी एकानेही लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. बोट नदीत जाताच अचानक बोट उलटली आणि एकच गोंधळ झाला.
मृतांच्या नातेवाईकांना एक लाखांची नुकसानभरपाई दरम्यान, या घटनेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो असं सांगून त्यांनी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
#UPDATE: Chief Minister Ashok Gehlot announces an ex-gratia of Rs 1 Lakh each to the next of the kin of the people who died in the incident of boat capsize in Kota. https://t.co/aNi4aLOGMq
— ANI (@ANI) September 16, 2020
Rajasthan : राजस्थानमध्ये चंबळ नदीत बोट बुडाली