एक्स्प्लोर
भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांचं उत्तर
या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेनं 88 हजार कोटींचं कर्ज दिलं असून, हे आजवर भारताला मिळालेलं सर्वात स्वस्त कर्ज असल्याचा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला.

प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावायला लागणार? या लाखमोलाच्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. 2023 हे बुलेट ट्रेन प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करु असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला अहमदाबादमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत हे भूमीपूजन होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारी ही पहिली बुलेट ट्रेन असेल. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेनं 88 हजार कोटींचं कर्ज दिलं असून, हे आजवर भारताला मिळालेलं सर्वात स्वस्त कर्ज असल्याचा दावा रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केला. 0.1 टक्के दरानं हे कर्ज 50 वर्षाच्या मुदतीसाठी देण्यात आलं असून, हे कर्ज फेडण्याची सुरुवात 15 वर्षांनी होणार आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून बुलेट ट्रेनवरुन जोरदार चर्चा सुरु आहे. सततच्या रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना बुलेट्र ट्रेन किती आवश्यक आहे यावरही काहीजण टीका करतात. मात्र देशात जेव्हा मारुती कंपनी सुझुकीसोबत उत्पादन करत होती, तेव्हाही अनेकांनी नाकं मुरडली होती, पण 30 वर्षांत त्यामुळे किती बदल झाला हे सगळ्यांनी पाहिलं, असं उत्तर गोयल यांनी दिलं. काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये- मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स ताशी 350 किमी धावण्याची क्षमता अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे. एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















