Rahul Gandhi : पश्चिम बंगाल, बिहार , यूपी, महाराष्ट्र, मुलींवर अत्याचारांच्या घटनांचा दाखला, समाज म्हणून आपण कुठे चाललोय, राहुल गांधी यांचा सवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी ट्विट केलं आहे. बदलापूर प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पहिलं पाऊल देखील उचललं गेलं नाही, असं ते म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बदलापूर मधील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणावर भूमिका मांडत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात झालेल्या उशिरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातही मुलींच्या विरोधात घडलेले गुन्हे समाज म्हणून कुठं चाललोय, हा प्रश्न निर्माण करतात असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी पहिलं पाऊल देखील उचललं जनतेनं न्यायासाठी आवाज उठवत रस्त्यावर येईपर्यंत गेलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले. आता एफआयर दाखल करण्यासाठी देखील आंदोलन करावं लागेल का? अखेर पीडितांना पोलीस ठाण्यापर्यंत जाणं देखील इतकं अवघड झालंय का? न्याय देण्यापेक्षा गुन्हेगारांना लपवण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. याचा फटका महिला आणि समजातील दुर्बल घटकांना बसतो, असं राहुल गांधी म्हणाले.
एफआयर दाखल झाल्यानं केवळ पीडित निराश होत नाहीत तर गुन्हेगारांचं धाडस देखील वाढतं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. सर्व सरकार, नागरिक, राजकीय पक्षांना गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. समाजात महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावलं उचलली जावीत यावर विचार केला पाहिजे. न्यायाचा अधिकार प्रत्येक नागरिकाचा आहे. त्याला पोलीस आणि प्रशासनाच्या मर्जीवर सोडून देता येणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांचं ट्विट
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 21, 2024
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’…
बदलापूर प्रकरणात आज काय घडलं?
बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी काल आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली आहे. काही आंदोलकांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या विरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं.
राज्य सरकारनं बदलापूर अत्याचार प्रकरणात एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग यांनी पीडितांच्या कुटुंबांची भेट घेतली.
दरम्यान, काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील बदलापूरमध्ये दाखल होऊन घटनेची माहिती घेणार आहेत. त्यानंतर ते पोलिसांना निवेदन देणार आहेत. बदलापूर प्रकरणावरुन राज्यभरात ठिकठिकाणी संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्वल निकम हे भाजपचे प्रवक्ते असल्यानं त्यांना या प्रकरणात सरकारी वकिलाची जबाबदारी देण्यावर आक्षेप घेतला.
संबंधित बातम्या :