Rahul Gandhi Remarks: राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या; 'या' याप्रकरणी न्यायालयानं दिलेत चौकशीचे आदेश
Savarkar Remarks Row: राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
Savarkar Remarks Row: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनौ (Lucknow Court) येथील न्यायालयानं मंगळवारी (2 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी सीआरपीसीच्या कलम 156 (3) अंतर्गत अधिवक्ता नृपेंद्र पांडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर हा आदेश दिला. न्यायालयानं हजरतगंज पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा तपास निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वतीनं करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे.
याचिकेत काय म्हटलं होतं?
पांडे यांनी आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, 17 नोव्हेंबर रोजी समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशानं राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटीशांचे सेवक म्हटलं आणि त्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याचं सांगितलं. याचिकेत म्हटलं आहे की, वीर सावरकर हे निर्भय स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अमानुष अत्याचार सहन केले.
राहुल गांधी यांनी हीन भावना पसरवण्यासाठी असभ्य शब्द वापरून वीर सावरकरांचा अपमान केला आणि द्वेषपूर्ण वक्तव्य केलं, असं फिर्यादीत म्हटलं आहे. महात्मा गांधी यांनी वीर सावरकरांना देशभक्त म्हणून संबोधलं आहे, पण राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यांनी त्यांच्या विरोधात अनावश्यक प्रचार करून सामाजिक तेढ आणि द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांना (तक्रारदार) मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात वीर सावरकरांबद्दल वक्तव्य केलं होतं. सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचा दावा राहुल गांधी यांनी बोलताना केला होता. त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं होतं की, मला तुमचे सेवक व्हायचं आहे. घाबरून त्यांनी माफीनाम्यावर सही केली होती. असं करून त्यांनी महात्मा गांधी आणि इतर नेत्यांचा विश्वासघात केला असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केलं होतं.