Rahul Gandhi In Jammu: राहुल गांधी म्हणाले.. मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित, आगामी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य
Rahul Gandhi In Jammu: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जम्मूमध्ये सांगितले की ज्या दिवशी एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात असे येईल की माझा आवाज ऐकला जातो, त्या दिवशी काँग्रेस 450 जागा जिंकेल.
Rahul Gandhi In Jammu: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जम्मूमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्तीचा आदर करायला हवा, तरच पक्ष लोकसभा निवडणुकीत 450 जागा जिंकू शकतो. तसेच ते म्हणाले की माझे कुटुंब आणि मी काश्मिरी पंडित आहोत.
राहुल गांधी म्हणाले, "जर काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल, तर फक्त एकच काम करायचं आहे, जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या शक्तीचा आदर करायला हवा. ज्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात असे येईल की माझं म्हणणं ऐकलं जातयं त्या दिवशी काँग्रेस पक्ष 450 जागा जिंकेल."
काश्मिरी पंडित बद्दल विधान
ते म्हणाले की मी आणि माझे कुटुंबही काश्मिरी पंडित आहोत. मला माझ्या सर्व काश्मिरी पंडित बांधवांना सांगायचे आहे की मी तुम्हाला मदत करणार आहे. राहुल गांधी म्हणाले, "मी जेव्हा काही बोलतो, तेव्हा ते मी नाही तर काँग्रेस कार्यकर्ता बोलत असतो. काश्मिरी पंडितांना भेटल्यानंतर मला समजले की, भाजपने त्यांना भरपाईचे आश्वासन दिले होते. पण, त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही."
मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देवी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांच्या शक्तींवर परिणाम
राहुल गांधी म्हणाले, "काल जेव्हा मी वैष्णो मातेच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा तिथे त्रिशक्ती होत्या - दुर्गा जी, लक्ष्मी जी, सरस्वती जी. 'दुर्गा जी' ज्याला आपण दुर्गा माँ म्हणतो; दुर्गा हा शब्द 'दुर्ग' वरून आला आहे; 'दुर्गा मा' म्हणजे संरक्षण करणारी शक्ती.
ते पुढे म्हणाले, "लक्ष्मी माँ म्हणजे 'ध्येय' पूर्ण करणारी शक्ती; जर तुमचे ध्येय पैसे असेल तर तुम्ही जे सांगितले ते देखील खरे आहे. जर तुमचे ध्येय दुसरे काही असेल, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मिळणारी शक्ती म्हणजे 'लक्ष्मी माँ'.
राहुल गांधी म्हणाले, "सरस्वती जी ती शक्ती आहे, ज्याला आपण विद्येची देवी/शक्ती, ज्ञान म्हणतो. या तीन शक्ती आहेत. जेव्हा या त्रिशक्ती घरात किंवा देशात असतात तेव्हा देशाची प्रगती होते. भारतात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मा लक्ष्मीची शक्ती कमी झाली आहे की वाढली आहे? शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे दुर्गा मातेची शक्ती कमी झाली की वाढली? जेव्हा भारतातील प्रत्येक संस्था, महाविद्यालय आणि शाळेत आरएसएसमधील व्यक्ती बसवला जातो, तेव्हा आई सरस्वतीची शक्ती कमी होते की वाढते? उत्तर आहे, कमी होते.
ते म्हणाले की, जे स्वतःला हिंदू (भाजप) म्हणवतात, ते वैष्णो देवी मंदिरात जाऊन डोके टेकवतात आणि त्याच त्रिशक्तीचा अपमान करतात. स्वतःला धार्मिक म्हणवता आणि मग त्याच शक्तींना दडपण्याचं काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.