
(Source: Poll of Polls)
Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो' यात्रेला कर्नाटकात मोठा प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला
Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला कर्नाटकात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा आज 39 वा दिवस आहे. आतापर्यंत या यात्रेने 1000 हून अधिक किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. भारत जोडो यात्रा ही सध्या कर्नाटकात असून त्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचणार आहे. भारत जोडो यात्रा ही गेल्या 21 दिवसांपासून कर्नाटकात असून या दरम्यान जवळपास 511 किमीचा प्रवास पायी कापण्यात येत आहे. कर्नाटकातील या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.
सोनिया गांधी यांचा सहभाग
राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या देखील सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकच्या मंड्या येथून त्या यात्रेमध्ये सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या कर्नाटक काँग्रेसच्या नेत्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर या सहभागी झाल्या होत्या. सोनिया गांधी या मोठ्या कालावधीनंतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिचा शेवट होणार आहे. एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाईल. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागतील.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
30 सप्टेंबरपासून कर्नाटकात प्रवास
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सात सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. पुढे जात ही यात्रा केरळहून 30 सप्टेंबरला कर्नाटकात दाखल झाली होती. कर्नाटकातील ही यात्रा 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. कर्नाटकात पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष वेगळ्या रणनीतीवर काम करत आहे. त्याचदृष्टीने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहा ऑक्टोबरला कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेत हजेरी लावली होती.
2023 सध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका
कर्नाटकात मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते, सध्या कर्नाटक हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे काँग्रेस भाजपला तुल्यबळ लढत देऊ शकते आणि पुन्हा सत्तेत येऊ शकते. त्यामुळेच दक्षिण भारतात भाजपचा एकमेव बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कर्नाटकात काँग्रेसने ताकत पणाला लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
