Rahul Gandhi on Hindutva:: राहुल गांधी म्हणाले, हिंदू आणि हिंदुत्व भिन्न; संघ-भाजपाची विचारधारा धोकादायक
Rahul Gandhi on Hindutva: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi on Hindutva: काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली. त्यांच्या पुस्तकातील लिखाणाचे राजकीय पडसाद उमटू लागले असून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. हिंदू आणि हिंदुत्व या दोन भिन्न गोष्टी आहेत. संघ-भाजपची विचारधारा ही द्वेष पसरवणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची डिजीटल मोहिमेची सुरुवात केली. या वेळी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची द्वेषपूर्ण विचारसरणी काँग्रेसच्या स्नेह, प्रेम आणि राष्ट्रवादी विचारांवर भारी पडली आहे. आपण या विचारांचा लोकांमध्ये आक्रमकपणे प्रसार केला नाही. आपल्याला या गोष्टीला स्वीकारावे लागणार. आपली विचारसरणी जिवंत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी म्हटले की, भारतात दोन विचारसरणी आहेत. एक काँग्रेस आणि दुसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. देशभरात भाजप आणि संघाने द्वेष पसरवला आहे. काँग्रेसची विचारसरणी ही बंधुभाव, प्रेमाची आहे. हिंदूइझम ( Hinduism) नव्हे तर हिंदूत्ववादी (Hindutva) विचारसरणीतून मुस्लिम, शीख समुदायावर हल्ले होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. हिंदू आणि हिंदुत्ववाद हे भिन्न विचार असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेते खुर्शीद यांनी काय म्हटंल होतं?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय. ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या खुर्शीदांच्या नव्या पुस्तकातील हिंदुत्वाच्या तुलनेमुळे खुर्शीद वादात सापडलेत. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आलाय. दिल्लीतील वकील विवेक गर्ग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तालयात खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
हिंदुत्वाबद्दल नेमकं काय लिहिलंय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकाचं प्रकाशन बुधवारी झालं. त्यावरुन आता देशात मोठा वाद सुरु झालाय. या पुस्तकात हिंदूत्वाबद्दल असं लिहिण्यात आलं आहे की, 'ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे.'
संबंधित वृत्त: