(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Cabinet : आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, 'या' नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी
आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात 5 नवीन मंत्र्यांचा संधी मिळण्याची शक्यता आहे.
Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात 5 नवीन मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे. आज पाच जणांच्या शपथविधीनंतर मान यांच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 15 होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता पंजाब राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे.
कोणाला मिळू शकते संधी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले नाव डॉ. इंदरबीर सिंह यांचे आहे. त्यांचाही आज मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. डॉ. इंदरबीर सिंह हे अमृतसर दक्षिणचे आमदार आहेत. दुसरे नाव अमन अरोरा यांचे आहे. ते संगरुरच्या सुनम मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तिसरे नाव फौजा सिंग सरारी यांचे आहे. सरारी हे गुरु हर सहायचे आमदार आहेत. चौथे नाव चेतन सिंह जोरमाजरा असून ते पटियालाचे आमदार आहेत. पाचवे नाव अनमोल गगन मान यांचे आहे, ते खरारचे आमदार आहेत. या विस्तारानंतर मान मंत्रिमंडळातील भगवंत मान यांच्यासह एकूण मंत्र्यांची संख्या ही 15 होणार आहे.
पंजाबमध्ये आम आदमीला मिळालं होत मोठं यश
या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आण आदमी पार्टीला पंजाबमध्ये मोठं बहुमत मिळालं होतं. या निवडणुकीत विधानसभेच्या एकूण 117 जागांपैकी 92 जागा जिंकून आम आदमी पार्टीनं सत्ता काबीज केली होती. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. दरम्यान, सुरुवातील मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात 10 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पंजाबच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या ही 18 आहे. मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सध्या नऊ मंत्री आहेत. मे महिन्यात आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.