Covaxin | येत्या काही महिन्यात कोवॅक्सिन लसीचं उत्पादन 6-7 पटीने वाढणार
सप्टेंबरपर्यंत दरमहा 10 कोटी कोवॅक्सिनचं उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे, असं भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितलं आहे.
Corona Vaccine : भारतात कोरोना संसर्गाचा वेग आता काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे की देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लस कशी मिळू शकेल. दरम्यान भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, सध्या मे-जूनपर्यंत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन दुपटीने वाढेल आणि जुलै ते ऑगस्ट दरम्यान त्याचे उत्पादन जवळपास 6 ते 7 पटीने वाढेल.
सप्टेंबरपर्यंत दरमहा 10 कोटी लस उत्पादन
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पुढे म्हटले की, सप्टेंबरपर्यंत दरमहा 10 कोटी कोवॅक्सिनचं उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. त्यांनी पुढे सांगितले की लसचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे भारत बायोटेकला सुमारे 65 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांनाही मदत केली जात आहे ,जेणेकरुन ते लस उत्पादनाची क्षमता वाढवू शकतील.
भारत बायोटेकने बुधवारी सांगितले की, कोविड लसींच्या पुरवठ्याबाबत कंपनीच्या हेतूविषयी काही राज्यांच्या तक्रारी बर्यापैकी निराशाजनक आहेत. भारत बायोटेकचे सह व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी ट्वीट केले की, कंपनीने 10 मे रोजी 18 राज्यांना कोवॅक्सिन लसींचे डोस पाठवले आहेत. अपुरी वाहतूक सुविधा असूनही, लसीचे डोस 18 राज्यात पुरवले गेले आहेत. काही राज्यांकडून आमच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणे निराशाजनक आहे. कोविडमुळे आमचे बरेच कर्मचारी कामावर येत नाहीत, तरीही आम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान सर्व वेळ काम करत आहोत.
18 राज्यात कोवॅक्सिनचा पुरवठा
हैदराबादमधील भारत बायोटेक आंध्र प्रदेश, हरियाणा, ओडिशा, आसाम, जम्मू-काश्मीर, तमिळनाडू, बिहार, झारखंड आणि दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यासह 18 राज्यांमध्ये कोवॅक्सिन लसीचा पुरवठा करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Nagpur on Coronavirus : राजकीय भेद विसरुन दोन गडकरी एकत्र, हिंगणघाटमध्ये 25 बेडचे कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय
- Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टातून थेट कॉल, पुढे काय झालं?
- राजकीय नेत्याने जाहीर कार्यक्रम करु नये असे आदेश जारी करावे लागतील : मुंबई उच्च न्यायालय
- AMU Coronavirus Death : अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू, नव्या व्हेरिएंटची चाचपणी करण्याची ICMRला विनंती