(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur on Coronavirus : राजकीय भेद विसरुन दोन गडकरी एकत्र, हिंगणघाटमध्ये 25 बेडचे कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय
कोरोनाच्या संकटात राजकारण बाजूला ठेऊन नागपुरात दोन गडकरी एकत्रित आले आणि ....
नागपूर : "बोले तैसा चाले" ही म्हण किमान राजकारण्यांना लागू पडत नाही. मात्र, कोरोनाच्या संकटात राजकारण बाजूला ठेऊन नागपुरात दोन गडकरी एकत्रित आले आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट सारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयाला मोलाची मदत तातडीने उपलब्ध झाली.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये डॉ. राहुल मरोठी यांचे रुग्णालय असून त्यात कोरोना बाधितांसाठी 25 बेड्सची व्यवस्था गेले अनेक दिवसांपासून तयार होती. मात्र, प्रशासन डॉ. मरोठी यांच्या रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी 25 बेड्सची परवानगी देत नव्हते. अनेक वेळा प्रयत्न करूनही जिल्हा प्रशासन परवानगी देत नाही म्हणून डॉ. मरोठी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांना संपर्क साधले.
कार्यकर्त्यांनी ही बाब मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांना सांगितली. हेमंत गडकरी यांनी हिंगणघाटसारख्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांना तातडीने मदत मिळावी यासाठी पक्षीय भेद सोडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धावले. नितीन गडकरी यांनी त्यांच्या स्वभावानुसार तातडीने मनसे नेते हेमंत गडकरी आणि हिंगणघाटमधील डॉ. राहुल मरोठी यांना बोलावून घेतले.
नितीन गडकरी यांनी त्वरित वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांना फोन करून रुग्णालय कोरोना बाधितांसाठी सेवा देण्यास तयार असताना का परवानगी देत नाही, अशी विचारणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजनची सोय झाल्यास त्वरित परवानगी देण्याची तयारी दाखविली. नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील बुटीबोरी मधून ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करून दिली.
Maharashtra COVID-19 Crisis : कोरोनाकाळात राजकारण करु नका; नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
नितीन गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर संबंधित रुग्णालयात फक्त दोनच व्हेंटीलेटर्स असल्याचे कळल्यावर त्यांच्याकडून 25 लाख किमतीचे 2 व्हेंटीलेटर्स आणि इतर आवश्यक उपकरण त्वरित दिले. त्यामुळे ज्या हिंगणघाटमध्ये एका सरकारी रुग्णालयाच्या पलीकडे कोरोनाबाधितांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, तिथे दोन गडकरी एकत्रतीत आल्याने अवघ्या काही मिनिटात 25 बेड्स चे कोविड रुग्णालय, ऑक्सिजनचा हमखास पुरवठा आणि एकूण 4 व्हेंटीलेटर्सची सोय निर्माण झाली आहे. मंगळवार पासून ही सर्व सोय कोरोना बाधितांच्या सेवेत कार्यान्वित झाली असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
राज्यात आणि देशात ऑक्सिजन पासून रेमडेसिवीरइंजेक्शन पर्यंत प्रत्येक छोट्या समस्यांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असताना नागपुरात मात्र पक्षीय भेद बाजूला ठेऊन एकेमकांना मदत करण्याचा नवा आदर्श पाहायला मिळाला आहे आणि गडकरी यांनी कोरोना काळात राजकारण नको त्यांचे हे वक्तव्य फक्त भाषणापुरतं मर्यादित नसून कृतीत आणून दाखविले आहे.