(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित; 15 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला देशाला मिळालेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती
Presidential Election: एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
Presidential Election 2022: आज देशाला 15 वे राष्ट्रपती (President) मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतगणना सुरु होईल. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (NDA presidential candidate Droupadi Murmu) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या विजयी झाल्या तर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल
18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संसद भवनात मतमोजणी होणार आहे. खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी होणार आहे. त्याच कक्षात मतदानही झाले. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. 8 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता. मुर्मू विजयी झाल्या, तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील. सकाळी 11 वाजता संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारे होणार मतमोजणी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम संसद भवनात झालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. संसद भवनात एकूण 730 मतदान झाले. या मतमोजणीनंतर राज्यांमधील मतांची मोजणी सुरू होईल. त्यासाठी 10 राज्यांच्या मतपेट्या आलटून पालटून काढल्या जातील. उदाहरणार्थ, पहिल्या 10 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश असेल.
यूपीमधून सर्वाधिक मते
यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदार यादीत एकूण 4809 मतदार आहेत. यामध्ये 776 खासदार आणि 4033 आमदार आहेत. खासदारांच्या एका मताचे मूल्य 700 असते तर आमदारांच्या एका मताचे मूल्य राज्यानुसार बदलते. आमदारांच्या एका मताचे कमाल मूल्य उत्तर प्रदेशात 208 आहे, तर सर्वात कमी 7 हे सिक्कीममध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या