विजयानंतर जो बायडन, कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा, म्हणाले...
जो बायडन Joe Biden यांचा राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस kamala harris यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.शुभेच्छा देताना मोदींनी (PM Narendra Modi) बायडन यांच्याशी गळाभेट घेताना एक फोटो देखील शेअर केला आहे.
नवी दिल्ली : अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे.डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. जो बायडन यांचा राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
जो बायडन यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, 'भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. शुभेच्छा देताना मोदींनी बायडन यांच्याशी गळाभेट घेताना एक फोटो देखील शेअर केला आहे.
Congratulations @JoeBiden on your spectacular victory! As the VP, your contribution to strengthening Indo-US relations was critical and invaluable. I look forward to working closely together once again to take India-US relations to greater heights. pic.twitter.com/yAOCEcs9bN
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचंही अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'तुमचं यश प्रेरणादायक आहे. हा केवळ आपल्या नातलगांसाठीच नव्हे तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील', असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Heartiest congratulations @KamalaHarris! Your success is pathbreaking, and a matter of immense pride not just for your chittis, but also for all Indian-Americans. I am confident that the vibrant India-US ties will get even stronger with your support and leadership.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
'मी देशाला तोडणारा नाही तर जोडणारा राष्ट्रपती' विजयानंतर बायडन यांची पहिली प्रतिक्रिया
विजयानंतर आपले गृह राज्य डेलावेयरमधील विलमिंगटनमध्ये संबोधित करताना बायडन यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, 7.4 कोटींहून अधिक अमेरिकन लोकांनी मला मतं दिली आहेत. ते म्हणाले की, मी राष्ट्रपती म्हणून ब्लू किंवा रेड स्टेट असं न पाहता यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका असं राष्ट्राकडे पाहील.
बायडन म्हणाले की, ज्या लोकांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना मत दिलं, त्यांची निराशा मी समजू शकतो. कटू वक्तव्यांना मागे सोडत एकमेकांना पाहण्याचा, ऐकण्याचा हा काळ आहे, असं ते म्हणाले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, अमेरिका... आपण आपल्या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडून दिलंय. यामुळं माझा आपण फार मोठा सन्मान केला आहे. पुढील काम अवघड जरुर आहे, मात्र मी आपल्याला वचन देतो की, मी संपूर्ण अमेरिकी जनतेचा राष्ट्रपती होईल, जरी आपण मला मत दिलं असेल किंवा नसेल. आपल्या विश्वासाला मी कायम राखेल. मला कल्पना आहे की, या अवघड निवडणुकीनंतर तणाव वाढू शकतो मात्र आपल्याला शांतता राखायची आहे, असंही ते म्हणाले.
अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून श्री ठाणेदार झाले आमदार
बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला
बायडन यांनी पेन्सिलवेनिया, वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा, डेलावेयर आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे.
जो बायडेन यांच्या या राजकीय काराकिर्दीची सुरुवात आजपासून बरोबर 48 वर्षांपूर्वी झाली. 1972 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकन सीनेटसाठी निवडून गेले होते. तेव्हा सीनेटवर निवडून गेलेल्या सर्वात कमी वयाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला गेला. आणि आता ते सर्वात वयस्कर राष्ट्राध्य़क्ष होतील. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या कारकिर्दीत बायडेन दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष होते. महत्त्वाचं म्हणजे ओबामा यांनी 'अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी उपराष्ट्रपती' असा त्यांचा उल्लेखही केला होता. जो बायडेन हे बराक ओबामा यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. या निवडणुकीत तर ओबामा बायडेन यांचा प्रचारही करत होते.
जो बायडन अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक
माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी आठ वर्ष काम केलं आहे. ओबामांसोबत बायडन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत. याशिवाय बायडन यांचे भारतीय अमेरिकन्ससोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तर भारतावर काय परिणाम होणार?
बायडन यांनी वेळोवेळी भारताचं समर्थन केलं आहे. नुकतंच ट्रम्प यांनी भारतातील अस्वच्छतेवरुन 'घाण देश' असल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावरुनही बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. तसेच बायडन म्हणाले होते की, आम्ही भारतासोबतच्या मैत्रीची कदर करतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिका भारतासोबत आहे. आम्ही भारतासोबत मिळून यावर काम करु. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सोबत आहोत, असं ते म्हणाले होते.
अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम होईल
जो बायडन यांचा निवडणूक जिंकल्याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहे. त्यांनी स्वतः असं म्हटलं आहे की सत्तेत येताच ते ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांमध्ये बदल करणार आहे. यात अमेरिका आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित देशांतर्गत बाबींचा समावेश आहे.