(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित 7 राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित 7 राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राज्य सरकारांना सूचना दिल्या.
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणात जगात दुसऱ्या नंबरवर असलेल्या भारतात रोज जवळपास 90 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशात आतापर्यंत 56 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे सर्वात प्रभावित असलेल्या देशातील सात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी बैठकीत संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन धोरण स्वीकारले होते आणि ते यशस्वी झाले. जगानेही त्याचं कौतुक केले. परंतु, आता आपण मायक्रो कंटेंट झोनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दोन दिवसांच्या स्थानिक लॉकडाऊन कोरोनाशी लढण्यात किती प्रभावी आहेत याचा विचार राज्यांनी केला पाहिजे. यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत आहे. ते म्हणाले, की सर्व संशोधनातून असे दिसून आले आहे की मास्क संसर्ग रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे. आपल्या दैनंदिन मास्कचा सहभाग केल्याशिवाय आपण कोरोनाशी लढू शकणार नाही.
या व्यतिरिक्त एका राज्यातून दुसर्या राज्यात सेवा पुरवठा खंडीत झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम रोजगारावरही होत आहे. मला सांगण्यात आले आहे, की ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र, राज्यांचे परस्पर संबंध चांगले असावे. संयम, करुणा, संवाद आणि सहकार्याची भावना देशाने पुढे नेली आहे. आपल्याला आता सर्वसाधारण प्रयत्नातूनही आर्थिक आघाडीवरची लढाई जिंकायची आहे.
महाराष्ट्रात दररोज सुमारे 20 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 12 लाख 42 हजारांवर गेली आहे. आंध्र प्रदेशातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आंध्र प्रदेशात 6 लाख 40 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहेत. त्याचप्रमाणे तामिळनाडू राज्यात देखील साडेपाच लाखांच्या वर रुग्णसंख्या गेली आहे. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढ होत आहे. दिल्लीत अडीच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाने गाठलं आहे. तर पंजाबमध्ये एकूण रुग्णांची संख्या 1 लाखाहून अधिक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिथंही कोरोना संसर्ग वाढत आहे.
पंतप्रधानांसह या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाबचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये देशाला दिलासा मिळाल्याच्या दोन बातम्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, गेल्या पाच दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. दुसरे म्हणजे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण भारतात खूपच कमी आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे.
PM Modi | कोरोनामुळे प्रभावित असलेल्या 'या' सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत पंतप्रधान मोदींची बैठक