Kumbh Mela 2021 | पंतप्रधानांकडून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन, मात्र आता उशीर झालाय?
हरिद्वारमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. कुंभच्या स्नानाच्या चार दिवसांत इथे 2376 कोरोना पॉझिटिव्ह सापडले. स्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन निरंजनी आणि आनंद या दोन आखाड्यांनी कुंभसमाप्ताची घोषणा केलीय.

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा उद्रेक सुरु असताना हरिद्वारमध्ये सगळे नियम धाब्यावर बसवत कुंभमेळ्याचं आयोजन सुरु आहे. आज खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं. पण आकडे पाहिले तर पंतप्रधानांच्या या आवाहनाला बराच उशीर झाल्याचं दिसत आहे. कोरोनाचा उद्रेक होत असतानाही प्रचंड गर्दीत साजरा होणाऱ्या कुंभमेळ्यावर अखेर पंतप्रधान बोलले. कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करा, असं आवाहन मोदींनी केलंय. कुंभमेळ्याच्या आयोजनातले एक महत्वाचे संत आचार्य महामंडलेश्वर यांच्याशी पंतप्रधानांनी सकाळी फोनवरुन चर्चाही केली.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
त्यावर अवेधाशनंद गिरी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. कुंभमेळ्यात लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन त्यांनी केलं. कुंभमेळा संपणार नाही तर प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा होईल असं ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या तीन शाही स्नानांपैकी दोन संपन्न झालेत. तिसरं आणि शेवटचं शाहीस्नान 27 एप्रिलला होणार आहे. 30 एप्रिलला कुंभमेळ्याची समाप्ती होणार आहे. पण आत्तापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी या स्नानासाठी हजेरी लावून झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला जरा उशीर झाला, असंच म्हणावं लागेल.
कुंभमेळ्याचं दुसरं शाहीस्नान 12 आणि 14 एप्रिलला बैसाखीच्या मुहूर्तावर होतं. त्याआधीपासूनच हरिद्वारमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला होता. वेगवेगळ्या आखाड्याचे जवळपास 19 संत कोरोनाने ग्रस्त आहेत. त्यापैकी दोन महत्वाच्या साधूंचं गेल्या दोन दिवसात निधन झालंय. दुसऱ्या लाटेची चाहूल देशात दिसत असतानाच कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु होती. त्यामुळेच त्याचवेळी पंतप्रधानांचं एखादं आवाहन आलं असतं तर कदाचित फरक दिसला असता.
हरिद्वारमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. कुंभच्या स्नानाच्या चार दिवसांत इथे 2376 कोरोना पॉझिटिव्ह सापडले. स्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन निरंजनी आणि आनंद या दोन आखाड्यांनी कुंभसमाप्ताची घोषणा केलीय. पण इतर आखाड्यांचा मात्र त्याला विरोध आहे. दिगंबर, निर्मोही आखाडा अजूनही कुंभ समाप्ती करायला तयार नाहीय. त्यामुळे आता पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम शेवटच्या टप्प्यात तरी काही दिसतोय का पाहावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
