Haridwar Kumbh Mela 2021 | कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
Haridwar Kumbh Mela 2021 : देशात कोरोनाचे संकट असताना कुंभमेळा प्रतिकात्मक ठेऊन त्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळाव्यातील आखाडा परिषदेला केली आहे.
![Haridwar Kumbh Mela 2021 | कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती Haridwar kumbh mela PM Modi urges the Kumbh be kept symbolic due to the Corona crisis Haridwar Kumbh Mela 2021 | कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/09/17f81724f7de8068e28611dcfc888a97_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : शुक्रवारी देशात तब्बल 2.34 लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील गर्दी आणि कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन या कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत संतांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा आणि त्याची सांगता करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू - संतांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा या दोन आखाडयांनी 17 एप्रिल रोजीच कुंभ समाप्तीचा निर्णय घेतला आहे.
हरिद्वारमध्ये होणारा कुंभमेळा हा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 30 एप्रिलला तिसरं शाहीस्नान होणार आहे. पण कोरोनाचा आकडा वाढत चालल्यानं या दोन आखाड्यांनी त्याआधीच कुंभसमाप्तीची घोषणा केलीय. अर्थातच या आखाड्यांचा हा निर्णय त्यांच्या पुरता मर्यादित आहे. कारण 13 आखाड्यांची एकत्रित संस्था असलेली आखाडा परिषद याबाबत अंतिम निर्णय काय घेतं हे महत्वाचं असेल. पण या दोन आखाड्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इतरही पाच सहा आखाडे कुंभसमाप्तीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.
निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज हे शाहीस्नाना आधीच कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर हृषिकेशच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत तर दुसरीकडे काल निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन झालं.
आता खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या विनंतीवर कुंभ मेळ्यातील आखाडा परिषद काय निर्णय घेते ते महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)