PM Modi Virtual Covid-19 Meeting: 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान 'लसीकरण उत्सव' साजरा करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
देशातील तरूणांना अशी विनंती करतो की तुमच्या आसपास ज्यांचे वय 45 वर्षांपुढे आहे त्यांना लसीकरणासाठी (Corona Vaccination) सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. याक्षणी संपूर्ण लॉकडाउनची गरज नाही, नाईट कर्फ्यू पुरेसा आहे. नाईट कर्फ्यूला 'कोरोना कर्फ्यू' (Corona Curfew) हा शब्द वापरला पाहिजे. यामुळे लोकांमध्ये योग्य संदेश जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना 'लसीकरण उत्सव' साजरा करण्याचे आवाहन केले. 11 एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या दरम्यान आपण सर्वजण 'लसीकरण उत्सव' साजरा करूया, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
लसीकरण महोत्सवात जास्तीत जास्त लोकांना लसी द्यावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी देशातील तरूणांना अशी विनंती करतो की तुमच्या आसपास ज्यांचे वय 45 वर्षांपुढे आहे त्यांना लसीकरणासाठी सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश कोरोनाच्या पहिल्या टप्प्याच्या पुढे निघून गेला आहे. बरीच राज्ये यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील सर्वोच्च पातळीच्या पुढे गेली आहेत. तर अनेक राज्ये या दिशेने वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाईट कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. मात्र नाईट कर्फ्यूला आपण 'कोरोना कर्फ्यू' हा शब्द वापरायला हवा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात की कोरोना फक्त रात्रीच पसरतो का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नाईट कर्फ्यूचा फॉर्म्युला जगभरात वापरण्यात आला आहे.
कोरोना कर्फ्यू रात्री 10 वाजता सुरू करुन सकाळपर्यंत ठेवला पाहिजे. लोकांना सावध करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आपल्याला Test, Track, Treat यावर भर द्यावा लागेल. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देणे गरजेचं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येकाची कोरोना टेस्ट झाली पाहिजे. याचा जरुर फायदा होईल. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या संपर्कात येणार्या कमीतकमी 30 जणांची तपासणी केली पाहिजे, असे सल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळ दिले.