Corona Curfew:'कोरोना कर्फ्यु' प्रभावी पाऊल, मायक्रो कंटेनमेंटवर भर देणे गरजेचं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात की कोरोना (Coronavirus) फक्त रात्रीच पसरतो का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं की, नाईट कर्फ्यूचा फॉर्म्युला जगभरात वापरण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा एक आव्हानात्मक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लोक बेजबाबदार दिसत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश कोरोनाच्या पहिल्या टप्प्याच्या पुढे निघून गेला आहे. बरीच राज्ये यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील सर्वोच्च पातळीच्या पुढे गेली आहेत. तर अनेक राज्ये या दिशेने वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाईट कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. मात्र नाईट कर्फ्यूला आपण 'कोरोना कर्फ्यू' हा शब्द वापरायला हवा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात की कोरोना फक्त रात्रीच पसरतो का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नाईट कर्फ्यूचा फॉर्म्युला जगभरात वापरण्यात आला आहे.
कोरोना कर्फ्यू रात्री 10 वाजता सुरू करुन सकाळपर्यंत ठेवला पाहिजे. लोकांना सावध करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आपल्याला Test, Track, Treat यावर भर द्यावा लागेल. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देणे गरजेचं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येकाची कोरोना टेस्ट झाली पाहिजे. याचा जरुर फायदा होईल. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या संपर्कात येणार्या कमीतकमी 30 जणांची तपासणी केली पाहिजे, असे सल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळ दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या बैठकीमध्ये काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट आहेत. त्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाचं संक्रमण पूर्वीपेक्षा आणखी वेगवान आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरात यासह अनेक राज्यांनीही पहिल्या लाटेची सर्वोच्च पातळी पार केली आहे. चिंतेची बाब म्हणजे लोक अधिक बेजबाबदार बनले आहेत. कोरोनाचं वाढतं संक्रमण मोठी समस्या निर्माण केलीआहे.
यावेळी परिस्थिती पहिल्यापेक्षा कमी आव्हानात्मक आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी आज आपल्याकडे पूर्ण व्यवस्था आहे. मास्क ते लस सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तहीही परिस्थिती अधिक आव्हानात्मक असल्याचे ते म्हणाले. पण आज आपल्याकडे संसाधने आणि अनुभव आहे, असं मोदी म्हणाले.