भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींच्या जवळ कसे पोहोचले? या व्हिडीओनं सुरक्षेसंदर्भात उपस्थित केले अनेक प्रश्न
एकीकडे पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरुन वाद निर्माण झाला आहे, अशातच दुसरीकडे एक नवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही निवळताना दिसत नाहीय. एकीकडे अजूनही याबाबत अधिकृत वक्तव्यांची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे आज आलेल्या नव्या व्हिडीओवरुन भाजपचे कार्यकर्तेच मोदींच्या इतक्या जवळ कसे पोहचले असेही सवाल उपस्थित होतोय.
पंतप्रधानांच्या ताफ्याला पंजाबमध्ये नेमकं कसं अडकावं लागलं यावरुन बराच राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यात या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतर एक नवा व्हिडीओ समोर आलाय. यात पंतप्रधानांच्या गाडीपासून अगदी जवळ भाजपचे झेंडे हातात घेतलेले लोक दिसत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं हे अंतर खूप धोकादायक आहे. भारतीय जनता पार्टी जिंदाबादच्या घोषणा हे लोक देताना दिसत आहेत. पण मुळात या लोकांना एसपीजीनं इतक्या जवळ कसं येऊ दिलं हाही प्रश्न आहे.
पंजाबमधे जो काही प्रकार घडला त्याबद्दल अजून पंतप्रधान कार्यालयाचं, एसपीजीचं किंवा पंजाब डीआयजीचं कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. पंतप्रधानांची सुरक्षा हा देशाच्या दृष्टीनंच गंभीर विषय आहे. पण त्यात अधिकृत माहिती, वक्तव्यांपेक्षा सध्या सोर्सेच्या हवाल्यानं माहिती, महामृत्यूजंय जपाच्या माध्यमातून धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम अशीच जंत्री सुरु आहे.
दुसरीकडे या घटनेवरुन आज सुप्रीम कोर्टातही सुनावणी झाली. पंजाब आणि केंद्र सरकारनं दोन वेगवेगळ्या चौकशी समिती याबाबत नेमल्या आहेत. एकाच घटनेबद्दल दोन वेगळ्या समिती का असाही सवाल उपस्थित होत असताना कोर्टानं आता दोन्ही समित्यांना तूर्तास काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी या प्रकरणावर पुढची सुनावणी होईल.
सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीत या घटनेत नेमकं काय झालं, कुणाची चूक याबाबत चर्चा झाली नाही. तर आज पहिल्या दिवशी फक्त हा तपासाचा मुद्दा कुणाच्या अखत्यारित यावरुनच युक्तीवाद झाले. पंजाब, केंद्र सरकार अशा दोन्ही समित्यांना रद्द करुन सुप्रीम कोर्ट स्वत:च एक चौकशी समिती नेमण्याचीही शक्यता दिसतेय.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही निर्देश दिलेत. कुठल्याही पद्धतीनं या सुरक्षेत तडजोड नको असं सोनियांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. तर शिवसेनेचीही भूमिका थोडी उशीरा का होईना पण अखेर समोर आली. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन पुढचे काही दिवस तरी राजकीय वातावरण रंगत राहणार हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या :
- पंजाबमध्ये PM मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी; सुप्रीम कोर्टात सॉलिसिटर जनरल यांचा पंजाब पोलिसांवर गंभीर आरोप
- PM Security Breach: पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
- ABP News C-Voter Survey : PM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणजे, षडयंत्र की राजकारण? जनतेचं म्हणणं काय?