(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उद्या आढावा बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत अनेक राज्यांसोबत बैठक घेतली आहे. अशातच पंतप्रधान उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीचं आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत कोरोना लसीच्या वितरणाबाबतही चर्चा होऊ शकते. तसेच देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच मोदी पुन्हा देशव्यापी संचारबंदीचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
काही शहरांमध्ये लावण्यात आला कर्फ्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत अनेक राज्यांसोबत बैठक घेतली आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा संसंर्ग झालेले नवे रुग्ण 50 हजारांच्या खाली येत आहे. तसेच काही राज्यांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यूही लावण्यात आला आहे.
भारतात पाच कोरोना वॅक्सिन तयार होण्याच्या मार्गावर
जेव्हा कोरोनावरील प्रभावी वॅक्सिन तयार होईल, त्यानंतर त्याचं वितरण करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने सतत प्रयत्न केले जात आहेत. भारतात सध्या पाच कोरोना वॅक्सिन तयार होण्याच्या मार्गावर आहेत. यांपैकी चार लसींची चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये आहे. तर एक पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहे.
भारतातील कोरोना परिस्थिती
देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 91 लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 45 हजार 209 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तसेच 501 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, काल दिवसभरात 43 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यां रुग्णांमध्ये वाढ होण्याची संख्या असेलेल्या देशांमध्ये जगभरात अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारताचा जगभरात पाचवा क्रमांक लागतो.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण 90 लाख 95 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी आतापर्यंत एक लाख 33 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर सध्या चार लाख 40 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत आणखी 1215 रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण 85 लाख 21 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 43 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :