PM Cares Fund : कोरोना काळात पालक गमावलेल्या मुलांना पंतप्रधानांची भेट! दैनंदिन गरजा, शिक्षणापासून ते आरोग्याची काळजी घेणार
PM Cares Fund : कोरोना महामारीच्या काळात अनेक मुलांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले, PM नरेंद्र मोदी यांनी या मुलांना पीएम केअर फंडातून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
PM Cares Fund : गेल्या काही वर्षात जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता, अशातच या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर कोट्यवधी लोकांना त्याचा सामना करावा लागला. सध्या देशातील परिस्थिती स्थिर असली, तरी रोजच कोरोना रुग्णवाढीची संख्या नोंदवली जात आहेत. त्याच वेळी, या महामारीच्या काळात देशभरात अशी अनेक मुले आहेत, ज्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलांना पीएम केअर फंडातून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनंदिन गरजा, अभ्यासापासून आरोग्याची जबाबदारी
चिल्ड्रन केअर फंड (PM-CARES for Children) बाबत बोलतांना, PM मोदी म्हणाले की, "हा केअर फंड या अनाथ मुलांच्या दैनंदिन गरजांपासून ते त्यांच्या अभ्यासापर्यंत आरोग्याची जबाबदारी घेणार आहे, मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांच्या घराजवळच्या कोणत्याही सरकारी किंवा खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाईल. शाळेचा सर्व खर्च, जसे- कॉपी , पेन-पेन्सिल, पिशव्या, कपडे हे सर्व केअर फंडातून पूर्ण केले जाईल.
18 ते 23 वर्षे वयोगटातील तरुणांना स्टायपेंड दिला जाईल : पंतप्रधान मोदी
पीएम मोदी म्हणाले की, जर एखाद्या मुलाला उच्च शिक्षणासाठी कर्जाची गरज असेल तर त्याला पीएम केअर फंडातून पूर्ण मदत मिळेल. याशिवाय त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दरमहा 4 हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ज्या मुलांना शिक्षण पूर्ण करून भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे, अशा मुलांनाही मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 18 ते 23 वर्षे वयोगटातील तरुणांना स्टायपेंड (विद्या निधी) देण्यात येणार आहे. त्याच वेळी, जेव्हा मुले 23 वर्षे पूर्ण करतील तेव्हा त्यांना एकाच वेळी 10 लाख रुपये दिले जातील.
5 लाखांपर्यंत मोफत उपचार : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजार कधीही कोणालाही होऊ शकतो. अशी कोणतीही समस्या एखाद्या मुलावर आली तर त्याला पैशाची काळजी करण्याची गरज नाही. पीएम केअर फंडातून आयुष्मान हेल्थ कार्ड देखील दिले जाईल, ज्याच्या मदतीने 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध होतील. पीएम मोदी म्हणाले की, मुलांना भावनिक आधार आणि मानसिक आधार देण्यासाठी विशेष संवाद सेवाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मुले संवाद हेल्पलाइन क्रमांकावरून तज्ज्ञांशी बोलू शकतात.